रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (08:16 IST)

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू

facebook/amitshah
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल (16 एप्रिल) महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन 11जणांचा मृत्यू झाला.
नवी मुंबईतील खारघर इथे आयोजित या कार्यक्रमाला काही लाख माणसं उपस्थित होती. नवी मुंबई परिसरात आज पारा चाळीशीपल्याड गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना झाला.
 
उष्माघाताचा त्रास झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात हलवावं लागलं. दुर्दैवाने त्यातील 11 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (16 एप्रिल) रात्री आठच्या सुमारास पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत म्हणाले, “मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल.”
 
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले.”
 
“एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या,” अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
 
 
रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत.
 
आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
 
मृतांपैकी 8 मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
 
1) श्रीमती वायचळ
 
2) तुकाराम वांगडे
 
3) महेश गायकर
 
4) मंजुषा भाबंडे
 
5) स्वप्नील केणे
 
6) संगीता पवार
 
7) जयश्री पाटील
 
8) भीमा साळवी
 
उर्वरित 3 मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
 
घटना दुर्दैवी आणि वेदनादायी - देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.
 
ट्विट करून ते म्हणाले, "आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे."
 
"मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे."
 
"जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
 
स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत," असंही फडणवीस यांनी म्हटलं.
 
विरोधकांची टीका
उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली.
 
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील म्हणाले, "आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
 
Published By- Priya Dixit