शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (21:08 IST)

मेट्रो कारशेडबाबत शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका योग्यच-आशिष शेलार

ashish shelar
सर्व मेट्रोचे कारशेड कांजूरमार्ग येथे असावे,असा दावा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिले. मेट्रो ३, ६ आणि १० यांचे एकत्रित कारशेड असावे, ही भूमिका आदित्य ठाकरे तुमच्या सरकारची होती. यासाठी तुमच्या पिताश्रींनी एक समिती नेमली. त्याचे सौनिक समिती असे नाव होते. त्या समितीचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रो तीनचे कारशेड आरेमध्येच करणे सोयीस्कर आहे. हा अहवाल तुमच्या पिताश्रींनी नेमलेल्या समितीचाच आहे. आरेमध्ये कारशेड केलेला खर्च पाण्यात घालून कांजूरमार्गमध्ये सर्वांचे कारशेड बांधण्याचा खर्च वेगळा करावा लागला असता. यात अक्कल आणि शहाणपणा कुठे आहे?, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
 
कुठल्याही प्रकल्पासाठी शासकीय आणि आर्थिक पातळीवर परवडतील असे निर्णय घ्यायचे असतात. जागा मिळाली तिथे कारशेड करा, हे धोरण अहंकारी असे आहे. आरेचे कारशेड पूर्ण झाल्यामुळे आज वर्षाअखेरीस मिळणारी मेट्रो ठाकरेंच्या अहंकारामुळे मिळालीच नसती. ठाकरे पिता-पुत्रांच्या अहंकारामुळे दररोज साडे पाच कोटींचे नुकसान मागच्या अडीच वर्षांपासून होते आहे. हा दररोजचा साडे पाच कोटींचा तोटा ठाकरे पिता-पुत्र कोणत्या कोषातून देणार आहेत. याचे उत्तर त्यांनी द्यावे. अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.
 
१५ एकरच्या बाबतीत आताच्या सरकारने घेतलेली भूमिका व्यवहार्यता तपासून घेतलेली आहे. मेट्रो ३ चे काम पूर्ण होऊन अन्य कामाला मदत करणारी आहे. दररोजचा साडे पाच कोटीचा तोटा भरून काढणारी आहे. आरेमध्ये आणि इंटिग्रेटेडमध्ये नव्याने झालेला खर्च यापासून वाचविणारी अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आदित्य ठाकरेंना हवे असल्यास मी त्यांना ट्युशन द्यायला तयार आहे, असा निशाणाही आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर साधला.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor