रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (20:54 IST)

नवसपूर्ती करण्यासाठी गेलेल्या माय लेकी केंद्राई धरण्यात बुडाल्या

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील खडकओझर येथील केंद्राई देवी मातेचा नवसपूर्ती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील वडार समाजाचे नागरिक आले होते. यावेळी २२ वर्षीय महिला व तिची ७ महिन्याची चिमुकली केंद्राई धरणातील पाण्यात बुडून मृत झाल्याची घटना घडली. या घटनेची वडणेरभैरव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहू नगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केंद्राई माता मंदिरात नवसपूर्ती करण्यासाठी आले होते. यावेळी सात महिन्याच्या मुलीचा नवस होता. ती सात महिन्याची तन्वी निलेश देवकर व तिची आई अर्चना निलेश देवकर (२२) या दोघी माय लेकी केंद्राई धरणातील पाण्यात बुडून मयत झाल्या. आई अर्चना देवकर हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. त्याचवेळी तिच्यासोबत मुलगीही होती. त्यामुळे दोघीही पाण्यात बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. 
 
खडक ओझरला श्री केद्राई देवीचे मंदिर आहे. येथे नवसपूर्तीसाठी विविध ठिकाणाहून भाविक येत असतात.  देवकर मायलेकीसुद्धा त्यापैकीच एक होत्या. 

Edited By-Ratnadeep Ranshoor