रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2024 (09:10 IST)

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, संख्याबळ कोणाच्या बाजूने-महायुती की महाविकास आघाडी?

uddhav shinde fadnavis
येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून त्याच दिवशी निकालही स्पष्ट होतील. गेल्यावेळेस 2022 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आणि राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली.
 
यावेळी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं पारडं जड झालं आहे. यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निवडणुकीत क्रॉस व्होटींग होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता आकडेवारीनुसार, महायुतीचे 9 आणि मविआचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात परंतु मविआने 1 अधिकचा उमेदवार दिल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे. म्हणूनच यात आमदारांची फोडाफोडी होणार का? अजित पवार गटाचे आमदार फुटणार का? अशी चर्चा रंगली आहे.
 
विधानपरिषदेच्या या निवडणुकीचं गणित नेमकं कसं आहे? कोणत्या पक्षाकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे? आणि कोणाचं गणित यात बिघडू शकतं? जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
 
महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत?
 
सुरुवातीला पाहूया, कोणकोणते उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 
भाजप
 
पंकजा मुंडे
परिणय फुके
सदाभाऊ खोत
अमित गोरखे
योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
 
शिवाजीराव गर्जे
राजेश विटेकर
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
 
कृपाल तुमाने
भावना गवळी
शिवसेना (उद्ध ठाकरे गट)
 
मिलिंद नार्वेकर
शेकाप (शरद पवार गटाचं समर्थन) -
 
जयंत पाटील
काँग्रेस
 
प्रज्ञा सातव
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, 'ही' निवडणूक नेमकी होते कशी?, जाणून घ्या सविस्तर
 
मतदान कसं होणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी विधानसभेचे आमदार मतदान देत असतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या प्रेफरंसच्या मतांनुसार उमेदवार निवडून येत असतो.
 
विधानसभेत आताच्या घडीला आमदारांचं संख्याबळ 274 आहे. यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या प्रेफरन्समध्ये 23 मतांची म्हणजे 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
 
संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो.
 
पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.
 
विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं.
 
पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.
 
महायुतीची ताकद किती आहे?
विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ - 288
 
विधानसभेत विद्यमान आमदारांची संख्या - 274
 
आता विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या 12 उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रत्येकी 23 आमदारांच्या मतांची गरज आहे. म्हणजे विधानसभेच्या आताच्या आमदारांच्या संख्याबळानुसार प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची गरज आहे.
 
भाजपचे आमदार 103
समर्थन असलेले अपक्ष आमदार - 7
शिवसेना (शिंदे गट) आमदार - 38
समर्थन असलेले आमदार - 10
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 40 आमदार
समर्थन असलेले अपक्ष आमदार - 2
महायुतीचे एकूण आमदार = 200
महायुतीचे एकूण उमेदवार - 9
यात भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांसह भाजपचे एकूण आमदार 110 आहेत. भाजप आमदारांनी आपल्या पहिल्या पसंतीची मतं भाजपच्या उमेदवाराला दिली तरी त्यांना पाच मतांची कमतरता आहे.
 
शिवसेना शिंदे गटाने दोन उमेदवार दिले आहेत. त्यांच्याकडे अपक्षांसह आमदारांची संख्या 48 आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन उमेदवारांसाठी त्यांच्याकडे आमदारांचं पुरेस बळ दिसत असलं तरी त्यांना समर्थन दिलेल्या अपक्षांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे.
 
सोबत असलेले अपक्ष मत देताना शिंदेंसोबतच राहतात की दुसरीकडे वळतात हे महत्त्वाचं ठरेल.
 
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 2 उमेदवार दिले आहेत. आपल्याकडे 40 आमदारांचं समर्थन असल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे.
 
परंतु आता लोकसभा निकालात निराशा पदरी पडल्यानंतर प्रत्यक्षात आता किती आमदार अजित पवार यांच्यासोबत राहतात की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मतं देतात हा या निवडणुकीतला सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे.
 
महाविकास आघाडी तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार?
महाविकास आघाडीत काँग्रेसचे आमदार - 37
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 12
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 15
अपक्ष - 1
मविआचे एकूण संख्याबळ - 65
मविआचे विधानपरिषदेसाठीचे उमेदवार - 3
काँग्रेसने त्यांच्या विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचं आमदारांचं संख्याबळ 37 आहे. यामुळे काँग्रेसच्या उर्वरित दहा ते सात आमदार मविआतील ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मत देतात की मविआचे दुसरे उमेदवार शेकपाचं जयंत पाटील यांना साथ देतात हे पहावं लागेल.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आताच्या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेत 15 आमदार आहेत. यामुळे मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी 8 आमदारांच्या मतांची गरज आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिलं आहे.
 
यामुळे शरद पवार यांचे 12 आमदार आणि मविआच्या इतर आमदारांच्या मतांची त्यांना गरज भासणार आहे. यात काँग्रेसचे अधिकचे आमदार कोणाला साथ देतात तसंच अजित पवार गटातील आमदार किंवा युतीच्या काही आमदारांचं क्रॉस व्होटिंग मविआच्या उमेदवारासाठी होतं का हे पहावं लागेल.
 
इतर पक्षांचे आमदार
 
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पक्ष - 2
एमआयएम - 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
कोणाचे आमदार फुटणार?
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्याने महायुतीसाठी अपेक्षित निकाल लागला नाही. या निकालानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन सुरू आहे.
 
या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी गुप्त मतदान होणार असून 12 उमेदवार रिंगणात असल्याने अधिकच्या एका उमेदवाराच्या पारड्यात कोणाची मतं जातात? यावरून कोणत्या पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात क्रॉस व्होटींग केलंय हे स्पष्ट होणार आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत शेवटच्या क्षणी डाव टाकला आणि मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. आता मविआचं संख्याबळ पाहता दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. परंतु तिसऱ्या उमेदवारासाठी मविला अधिकच्या आमदारांची मतं आवश्यक आहे.
 
आता या परिस्थितीत महायुतीत भाजपच्या दोन मित्र पक्षांपैकी कोणाची मतं फुटतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “आमच्याकडे दोन मतं अधिकची दिसत असली तरी आमच्यासोबत असलेले 10 अपक्ष आमदार कोणाच्या पारड्यात मतं टाकतात हे महत्त्वाचं आहे. यामुळे आमच्या मित्र पक्षांना (भाजप आणि अजित पवार गट) मदत करण्यापूर्वी आम्ही आमचे दोन उमेदवार कसे विजयी होतील यासाठी काम करणार.
 
आम्हाला यापूर्वी समर्थन दिलेल्या काही अपक्ष आमदारांची भूमिका आताच्या घडीला अस्पष्ट आहे. ते कोणाला साथ देतील माहिती नाही परंतु इतर छोट्या पक्षातील आमदार आमच्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
 
ते पुढे म्हणाले, “मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी म्हणजे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शरद पवार यांनी अजित पवार यांचे आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे. कारण मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणायचं असेल तर त्यांना मोठ्या संख्येने आमदारांची गरज आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभेत अपयश आलं. यामुळे विधानसभेसाठी त्यांचे आमदार आपलं समर्थन बदलू शकतात. यामुळे नार्वेकर यांना किती मतं कोणाकडून मिळतात आणि अजित पवार गटाच्या कोणत्या आमदाराला किती मतं कमी पडतात हे समोर आल्यावर ही बाब स्पष्ट होईल,”
 
हेच मत राजकीय विश्लेषक सुद्धा व्यक्त करतात. अधिकचा उमेदवार रिंगणात उतरल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
 
ते म्हणाले, “गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटींग होऊ शकते. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये हे झालेलं आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी काँग्रेसची मतं फुटली होती त्यावेळी सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला होता. तसंच दोन वर्षांपूर्वी काँग्रेसची मतं फुटल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. त्यामुळे मतांची फाटाफूट होऊ शकते.”
 
ते पुढे सांगतात, “या निवडणुकीत काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला फटका बसू शकतो. काँग्रेसची दुसऱ्या पसंतीची मतं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली मतं याच्यावर मिलिंद नार्वेकर यांचा विजय होऊ शकतो. परंतु शरद पवार गटाने जयंत पाटील यांना आपलं समर्थन दिलेलं आहे.
 
त्यांना शरद पवार गटाचे 12 आमदार, शेकापचा एक आमदार, सपा, माकप यांची साथ मिळू शकते, यांनी जर मदत केली तर 16 मतं त्यांना मिळू शकतात. तरीही 7-8 मतं त्यांना बाहेरून मिळवावी लागतील. ही मतं त्यांना कुठून मिळतात हे पहावं लागेल.
 
“तसंच अजित पवार गटाचे दोन उमेदवार आहेत. त्यांना 46 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवारांनाही पाच ते सहा मतांची आवश्यकता भासणार आहे. विधानपरिषदेचं हे गणित पाहता मतं फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका कोणत्याही पक्षाला बसू शकतो,”
 
ज्येष्ठ पत्रकार विनया देशपांडे सांगतात, "यंदाची विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी दोन अपक्ष. त्यामुळे खरं लक्ष असं लागलं आहे की क्रॉस व्होटिंग कशा प्रकारे व्हायची शक्यता आहे. या निवडणुकीत ती शक्यता नाकारता येत नाही. First preference चे 23, अशी जिंकण्यासाठी मतांची गरज आहे. सेकंड preference व त्यापुढे हे गणित क्लिष्ट होत जातं. सध्या काही पक्षांमध्ये, विशेषतः अजित पवारांच्या पक्षात कशा प्रकारे मतदान होईल हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.
 
विधानपरिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख 5 जुलै आहे. आताच्या उमेदवारांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्यास या निवडणुकीत क्रॉस व्होटींगची शक्यता अधिक असून कोणत्या पक्षाला याचा फटका बसतो ते पहावं लागेल.
 
Published By- Dhanashri Naik