रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (11:36 IST)

महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू, हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना

3 trekkers from Maharashtra die in Himachal Pradesh
हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षाव झाल्यानं अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 3 ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर दरम्यान 10 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. 
 
महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालमधील 1 असे 13 ट्रेकर्स यांनी 17 ऑक्टोबरला रोहरू ते विलेज-बुरुआ, तेह-सांगला, जिल्हा-किन्नौरपर्यंत ट्रेकिंगला सुरुवात केली. बुरुआ कांडा वरच्या भागात बर्फ पडल्यामुळे हे सर्व ट्रेकर्स तिथे अडकले. यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. जवळपास 15 हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मृतदेह शोधण्यासाठी आयटीबीपीची टीम आज घटनास्थळी पोहोचत आहे.
 
17 व्या बटालियन इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची टीम शोध आणि बचाव कार्य करत आहे. दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या ग्रूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला होता.
 
तीन जणांचा मृत्यू
राजेंद्र पाठक (६५ वर्ष)
अशोक भालेराव (६४ वर्ष)
दीपक राव (५८ वर्ष)
 
दोन दिवसांपूर्वी हवाई दलाने लमखागा खिंडीतून 11 मृतदेह बाहेर काढले. हा ग्रूप 18 ऑक्टोबर रोजी प्रचंड हिमवर्षाव आणि खराब हवामानामुळे बेपत्ता झाला होता. ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने 20 ऑक्टोबर रोजी बचाव कार्य सुरू केले. असं सांगण्यात येत आहे की, हे ट्रेकर्स 14 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या हर्षिल येथून हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये चित्कुलसाठी रवाना झाले होते. पण ते 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीजवळून बेपत्ता झाले.