नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू
महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वर्षाच्या सुरुवातीस 3 रस्ते अपघाताने 5 जणांचा मृत्यू झाला. तिन्ही घटना कोराडी व कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
पहिल्या घटनेत घराजवळ खेळत असताना 2 वर्षाच्या एका चिमुकलीची गाडीची धडक बसून गंभीर जखमी होऊन काही वेळातच मृत्यू झाला. साधना अरुण उईके असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. ती घराच्या अंगणात खेळत असताना कार चालकाने रिव्हर्स घेताना साधनाला धडक दिली त्यात ती गंभीर जखमी झाली.
भट्टीवर काम करणाऱ्यांना माहिती मिळतातच ते धावत घटनास्थळी गेले आणि तिला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साधनाच्या वडिलांनी गाडी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
तर दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखली उड्डाण पुलावर घडली. बुधवारी दुपारी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना चिरडले. दोघे जागीच मरण पावले. गुलाब तुकाराम भजनकर आणि महादेव विठोबा सहारे असे या मयतांची नावे आहे. हे दोघे बुधवारी दुपारी दुचाकीवरून कळमना येथून यशोधरानगरकडे जात असताना चिखलीपुलावरील आरटीओ कार्यालयासमोर बेदरकारपणे येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यावर दोघांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुलाब यांच्या जावयाने ट्रकचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे.
तर तिसरा अपघात कोराडी येथील महादुला टी पॉईन्टजवळ झाला. रात्रींचे जेवण आटोपून संध्याकाळच्या शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका58 वर्षीय व्यक्तीला भरधाव येणाऱ्या कार ने जोरदार धडक दिली. नंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात विजय बाबुलाल मालवीय यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी कार चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस अज्ञात कारचालकाचा शोध घेत आहे.
Edited By - Priya Dixit