बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धुळे येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट 7 जणांचा मृत्यू तर 35पेक्षा अधिक जखमी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट  झाला असून भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. तर 35 पेक्षा अधिक  जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण  स्फोटानंतर फार मोठ्या प्रमाणात आग लागली असून, आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या स्फोटात अधिक लोकांचा मृत्य होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे धुळे सह संपूर्ण राज्य हादरले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी केमिकल फॅक्टरी मध्ये सकाळी दहाच्या सुमारास हा भयानक स्फोट झाला व  त्यानंतर भीषण आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या ठिकाणी बचाव पथक , रुग्णवाहिका आणि  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
हा स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन, पोलिसांना तातडीने माहिती दिली. हा भयानक स्फोट झाला त्यानंतर मोठा  आवाज झाला होता, पोलिसांनी घटनास्थळाकडे जाण्यापासून नागरिकांना थांबवले असून संपूर्ण परिसर सुरक्षित केला आहे . त्या ठिकाणी आता  केवळ बचाव पथकांनाच जाऊ दिलं जात आहे.
 
हा भीषण स्फोट कसा काय झाला याचे कारण समोर आले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितल्या नुसार या  स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो अनेक किलोमीटर लांबपर्यंत ऐकायला गेला तर  या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला आहे. तर आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. या कंपनीत नेमके किती कामगार होते याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस पथक बचाव पथक सर्व मिळून यातील अडकलेल्या लोकांना वाचवत असून जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.