बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धुळे: केमिकल कंपनीत जोरदार स्फोटानंतर आग

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळच्या एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून किमान 43 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
 
वाहाड केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाला असून आग रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र ही केमिकल कंपनी असल्याने आग लगेच आटोक्यात येणे अशक्य आहे, जरा वेळ लागणार, असं धुळ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ म्हणाले.
 
स्फोट एवढा मोठा होता की त्याचे हादरे आजूबाजूच्या गावातही जाणवले. या कंपनीत जवळपास 30 लोक काम करतात, मात्र स्फोट झाला तेव्हा नेमके किती लोक आत होते, याची अचूक माहिती उपलब्ध नाही.
 
मात्र 22 जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र आग विझल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असं भुजबळ पुढे म्हणाले. दरम्यान, एकूण या घटनेत एकूण सहा जण ठार आणि 43 जखमी झाल्याचं धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितलं.
 
कंपनीमध्ये कुणीही अडकलेले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे, असंही ते पुढे म्हणाले.
 
सध्या बचाव कार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्राधान्य आहे. आग कशी लागली वगैरे, हे नंतर समोर येईलच, असं गिरीश महाजन म्हणाले.
 
पोलीस घटनास्थळी दाखल आहेत, पण कंपनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आगीपासून सर्वच यंत्रणांना सुरक्षित अंतरांवर थांबवले गेले आहे.