1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 7 जुलै 2021 (09:31 IST)

आठ वर्षाच्या मुलाने वाढदिवशी दिले असे रिटर्न गिफ्ट

कोरोनाच्या साथीमध्ये अनेक विद्यार्थ्यानी आपले आई, वडील किंवा दोन्हीही पालक गमावलेत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर तर कोसळला पण त्यासोबत भविष्यातील शिक्षणाची  चिंता सुद्धा. अशा विद्यार्थ्याचे  शिक्षण अडचणीत येऊ नये म्हणून नाशिक शहरांमधील स्वयंसेवी संस्था त्यांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत.शिक्षणापासून ही मुले वंचित राहू नये म्हणून गिव्ह वेलफेयर ऑर्गनाझेशन या स्वयंसेवी संस्थेने २७ विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली.

या मुलांना प्रायोजक किंवा मदतीसाठी बरेच देणगीदार पुढे आले आणि  २३ विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रायोजकत्व मिळाले. मात्र, चिंता चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होती.त्या चार विद्यार्थ्याचे एकूण शुल्क दोन लाख बारा हजार (रु. २,१२,०००) होते.इतक्या मोठ्या रकमेसाठी कोणीही प्रायोजक मिळेना.गिव्हचे अध्यक्ष रमेश अय्यर यांनी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांना  मदत करण्यासाठी आवाहन  करणारे पत्र लिहिले.

३० जून रोजी रमेश अय्यर यांनी आपल्या भाच्याच्या आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. या भाच्याने तर कमाल केली. स्वत:च्या वाढदिवसानिमित्त या आठ वर्षाच्या लहान मुलाने आपल्या पालकांना या चार पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना “रिटर्न गिफ्ट” म्हणून  मदत देण्यास सुचविले आणि आनंदी पालकांनी त्वरीत सहमती दर्शविली.या परराज्यातील पालकांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्याना मदत करताना ’आमचे नाव कोठेही प्रसिद्ध करू नका’ असे आवर्जून सांगितले हे विशेष.

शाळा महाविद्यालयांचे नवीन सत्र सुरु झाले. पण शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गिव्ह वेलफेयर ऑर्गनाझेशनने २७ मुलांच्या फी व शैक्षणिक साहित्यासाठी पाच लाख सत्तावन्न हजार (र.५,५७,०००) रुपये  जमा केले आणि सात शाळांना धनादेश दिले. फीमध्ये सवलत देण्यासाठी गिव्हने काही शाळांना आवाहनही केले आहे. याशिवाय आणखी काही गरजू विद्यार्थ्यानी मदतीची मागणी केली आहे. त्यासाठीही शैक्षणिक प्रायोजक पालक मिळतील असा विश्वास रमेश अय्यर यांनी व्यक्त केला  आहे.