शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:49 IST)

कॅरीबॅग उचलण्यासाठी आईचा हात सोडला अन् सहा वर्षीय बालकाचा अपघातात जीव गेला…

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या वर्षभरात हिट अँड रनचे वीस टक्के अपघात नाशिक विभागात झाल्याचे निदर्शनास आले आहे.अशातच वर्षाच्या सुरवातीलाच नाशिक शहरात एक सहा वर्षीय बालक हिट अँड रनचा शिकार झाला आहे.द्वारका परिसरात रस्ता क्रॉस करताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू हृदयद्रावक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
 
नाशिकमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अशातच आईसोबत रस्ता क्रॉस करताना सहा वर्षीय मुलाचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
नाशिक शहरातील नाशिक मुंबई महामार्गानजीक कशिश हॉटेलजवळ येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. आशिष धोत्रे असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. फिर्यादी म्हणेजच मुलाची आई व त्यांचा मुलगा आशिष असे दोघे कशिश हॉटेलकडून लेखानगरकडे उड्डाणपुलावरून पायी रस्ता ओलांडत असतांना फिर्यादी यांचे मुलाच्या हातात असलेली कॅरीबॅग ही खाली पडल्याने ती बॅग घेण्यासाठी तो त्यांचा हात सोडून ती बॅग घेण्यासाठी मागे वळला असता त्याच वेळी द्वारका बाजूने मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी पांढऱ्या रंगाच्या कारने धडक दिल्याने ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिक शहरातील सिडको परिसरात महाकालिका मंदिरा शेजारी हे धोत्रे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. फिर्यादी व त्यांचा मुलगा हे दोघे जालना येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते एका ट्रकने नाशिकला येत होते. नाशिकमध्ये काल सकाळी द्वारका परिसरात सव्वा सहाच्या सुमारास उतरले. यावेळी हे दोघेही रस्ता ओलांडत होते. यावेळी मुलाच्या हातात एक कॅरीबॅग होती, ही कॅरीबॅग अचानक त्याच्या हातातून निसटली. कॅरीबॅग निसटल्याने त्याने आईचा हात सोडून त्या कॅरीबॅगसाठी रस्त्यात गेला.
 
बॅग घेण्यासाठी मागे वळला असता त्याच वेळी द्वारका बाजुने मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी पांढरी रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने फिर्यादी यांचा मुलगा आशिष यास जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.  दरम्यान या अपघातामध्ये मुलगा गमाविलेल्या आईने टाहो फोडला. एकीकडे रस्ते अपघात वाढतच असून यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात असल्याचे वास्तव आहे. तर दुसरीकडे अपघात कमी व्हावे म्हणून प्रशासन नेमक्या काय उपाययोजना करत आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
 
कारण भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी प्रशासनांसह पोलिसांनी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे. जेणेकरून अशाप्रकारे निष्पाप जीवांचे प्राण वाचतील दरम्यान या प्रघात प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताची चौकशी करण्यात येईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अंबड पोलिसांनी दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor