कसबा डिग्रजमध्ये वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण; स्टेटस ठेवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
कसबे डिग्रज (ता.मिरज) येथे एका युवकाने मोबाईलवरती वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी संबंधित युवकास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून गावामध्ये सध्या शांतता आहे. काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गावातील प्रमुख नेतेमंडळी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी रात्री सातच्या सुमारास गावातीलच एका युवकाने आपल्या व्हॉट्सअँप स्टेटस वर वादग्रस्त पोस्ट करणारा व्हिडिओ लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावातील युवकांनी संबंधित युवकास याबाबत जाब विचारला. हि बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सदर घटनेची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण आणले.
या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळपासून कसबे डिग्रज गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त बंद पुकारला. या बंदमध्ये गावातील प्रमुख बाजारपेठेसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. गावात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या युवकावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देत पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.