शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (08:56 IST)

नांदेडच्या व्यापाऱ्याचा यूपीत अपघाती मृत्यू

नांदेड येथील व्यापारी कृष्णा बालाप्रसाद लोकमनवार यांच्या मातोश्री चातुर्मासानिमित्त वाराणसी येथे होत्या. त्यांना नांदेडला घेऊन येण्यासाठी म्हणून कृष्णा लोकमनवार हे शनिवारी वाराणसी येथे खासगी वाहनाने गेले होते. दरम्यान, मातोश्री व त्यांच्या मावशी या दोघींना सोबत घेऊन ते रविवारी नांदेडकडे निघाले होते. वाराणसीपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग १९ वरील चुनार येथे (जि. मिर्झापूर) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते लघुशंकेसाठी म्हणून वाहनातून उतरले. यावेळी रस्ता ओलांडणार तोच पाठीमागून एका भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांचा मृतदेह वाराणसी येथून विमानाने हैदराबाद येथे आणण्यात आला. त्यानंतर हैदराबादहून नांदेडमध्ये वाहनाने त्यांचा मृतदेह नांदेडमध्ये आणला जाणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. जितेंद्र लोकमनवार यांचे ते बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दि. २३ रोजी दुपारी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक विजयकुमार लोकमनवार यांनी दिली.