साडेचार वर्षांच्या चिमुकलीला अखेर न्याय मिळला; मालेगाव रेप -हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
मालेगाव न्यायालयाने डोंगराळे रेप-हत्या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण केले, अत्याचार केला आणि डोकं दगडाने ठेचून किंवा गळा आवळून हत्या केली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी विजय संजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
माहितीनुसार १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी विजय खैरनार (वय २४) याने अवघ्या साडेचार वर्षांच्या निरागस बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह मोबाईल टॉवरच्या तारेच्या कुंपणात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संवेदनशील खटल्यासाठी राज्य सरकारने प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद या निकालात अत्यंत निर्णायक ठरला. या संपूर्ण घटनेत कोणताही थेट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. तरीही तत्कालीन उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या २३ दिवसांत भक्कम दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. सरकारी पक्षाने २४ साक्षीदार तपासले, तसेच डीएनए व इतर परिस्थितीजन्य पुराव्यांची अभेद्य साखळी न्यायालयात सिद्ध केली. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासोबतच, पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहे.गुन्हा घडल्यापासून अवघ्या ११ महिन्यांच्या आत जलदगती न्यायालयाने दिलेल्या या कडक निकालाचे पीडित कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत केले जात आहे.

