रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (07:29 IST)

आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्या घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करुन औषधसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन यांनी गुप्तवार्ता विभागास व मे. इंटास फार्मासुटीकल प्रा. लि.या उत्पादकाने दिलेल्या तक्रारी अनुषंगाने Gobucel Injection,10% (Intravenous Human Normal Immunoglobulin for Intravenous Use IP 10%) Batch No.97130072, M/s Intas Pharmceuticals, Ahemdabad या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यात विक्री होत असल्याच्या गोपनीय माहिती आधारे मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव जिल्हा जळगाव या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग व जळगाव कार्यालयाच्या पथकाने दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी चौकशीसाठी छापा टाकला असता या पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विनाखरेदी बिल प्राप्त केला व  त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.
 
या प्रकरणी पुढील चौकशीत मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स,चाळीसगाव या पेढीने मंजूर असलेल्या जागेतून विनापरवाना जागेत स्थलांतरण केले असल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे कारवाईच्या वेळेस उपलब्ध असलेला अंदाजे रू २.७७ लक्ष किमतीचा इतर औषधसाठा पंचानाम्यांतर्गत जप्त करण्यात आला.
 
या प्रकरणी मे.जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव या पेढीने खरेदी बिलाशिवाय संशयित बनावट  Gobucel Injection 10% ची खरेदी करून त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पेढीस केली असल्याने पेढीचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके व मे. श्रीक्रिधा इंटरनँशनल हेल्थकेअर चे मालक सुनील ढाल यांचे विरुद्ध भा. द. वि. च्या विविध कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४४६/२०२१ दाखल करण्यात आला आहे.
 
या कारवाईत गुप्तवार्ता विभाग मुख्यालयातील सर्वश्री ग. रा. रोकडे, सहायक आयुक्त, वि. रा. रवी औषध निरीक्षक, सुरेश देशमुख, औषध निरीक्षक नाशिक व जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री तासखेडकर व  औषध निरीक्षक श्री अनिल माणिकराव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास अन्न औषध प्रशासन, जळगाव व चाळीसगाव पोलीस संयुक्तरित्या करत आहेत.
 
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह व सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.