सुशांत सिंह राजपूत प्रकरण: खासदार शेवाळेंचा गंभीर आरोप…. ठाकरेंनी दिले हे प्रत्युत्तर
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. तर दुसरीकडे खासदार शेवाळे यांच्या आरोपाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिले आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता शेवाळे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याकाळात सातत्याने भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. आदित्य ठाकरेंनीही एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच, सुशांतच्या आत्महत्येवरून गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याचेही आदित्य यांनी म्हटले होते.
आता पुन्हा एयूचा विषय खूप गंभीर असून एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात खासदार शेवाळे यांनी आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, त्या घाणीत मला जायचे नाही. ज्यांची निष्टा ज्यांच्या घरात नसते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? बंडखोरी केलेल्यांना त्यांचेच मित्रपक्ष अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य प्रश्नानांवरून लक्ष हटवण्यासाठी असे घाणेरडे मुद्दे पुढे केले जात आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor