रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (09:23 IST)

वृक्षांवर जाहिराती थेट मुख्यमंत्र्याकडे ई – मेलव्दारे तक्रार

नाशिक महापालिकेच्या हद्दीत वृक्षांवर लावण्यात आलेल्या जाहिरातीबाबत महानगरपालिकेने पोलिस स्थानकात विविध तक्रारी करुन आतापर्यंत गुन्हे दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. वृक्षप्रेमी वैभव देशमुख यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्याकडे ई – मेल व्दारे तक्रार केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने देशमुख यांना आतापर्यंत कारवाई केल्याची माहिती दिली आहे. त्यात विविध विभागात ही कारवाई केल्याचे नमुद केले आहे.
 
देशमुख यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, जत्रा हॉटेल, रासबिहारी स्कूल, अमृतधाम तसेच इतर ठिकाणी हायवेला लागून असलेल्या छोट्या मोठ्या वृक्षांवर मोठे मोठे ख़ीळे ठोकून शेकडो वृक्षावर जाहिरातीचे फलक लावलेले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील लाखो वृक्षांना हानी पोहचवण्याचा हा दुर्दैवी प्रकार आहे. या जाहिराचे फलक लावणे ताबडतोब बंद व्हायला हवे. महानगरपालिका उद्यान विभाग आयुक्त यांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. 
 
सध्या कोरोनामुळे नाशिक शहराची परिस्थिती अत्यंत ख़राब आहे. यातही अनेक छोटे मोठे व्यावसायिक, बॅनर होर्डिंग व्यावसायिक या कालावधीचा फायदा घेत वृक्षांना प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत आहे. ऑक्सीजन अभावी एकीकडे कोरोना रुग्णांना जिव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी वास्तव आपल्या समोर आहे. मार्केटिंगच्या युगात ’वस्तूची जाहिरात मोठी तर तिचा खपही मोठा’ असे समीकरण आहे. जाहिरातीसाठी पोस्टरबाजी करायची तर त्यासाठी मोकळी जागा नाही. मग झाडे आहेत की, बॅनर लावायचे, ठोका झाडावर खीळे अशा मोठ्या झाडांवर फुकटच्या जाहिरातबाजीमुळे असंख्य खीळे ठोकलेले वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. यातही आर्थिक हित असते की काय याचीही शक्यता अजिबात नकारता येत नाही.  वृक्ष प्राधिकरण समितीचा भोंगळ कारभारावरही अंकुश ठेवावा असे तक्रारीत म्हटले आहे.