शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (10:26 IST)

अखेर राज्य सरकारने १३२८ बळींची दखल घेतली

आयसीएमआरच्या नियमावलीनुसार राज्य सरकारने मुंबईत झालेले तब्बल ९५० कोरोना बळींची माहिती दडवल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. खुद्द आयसीएमआरने देखील अशा ४५० मृत्यूंचा उल्लेख केला होता. अखेर या मृतांच्या आकडेवारीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली असून  एकूण १३२८ अतिरिक्त बळींची नोंद राज्य सरकारने घेतली आहे. यामध्ये मुंबईतले ८६२ मृत्यू तर राज्याच्या इतर जिल्ह्यात झालेल्या ४६६ मृत्यूंचा समावेश आहे.
 
यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार? हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे’. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर राज्य सरकारने हे १३२८ मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले.