लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंना पाचवं स्थान मिळालं
पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे यांना सुरुवातीच्या कार्यकाळातच मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनाचं मोठं संकट राज्यावर असतानाच त्यात निसर्ग चक्रीवादळाची देखील भर पडली. मात्र अशातही आपल्या प्रशासनात या संकटांना तोंड देण्याची धमक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या याच ठामपणामुळे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंना पाचवं स्थान मिळालं आहे. तसंच भाजपशासित राज्यातील एकही मुख्यमंत्री या यादीत नाही.
आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्था देशातील वेगेवगेळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेचं संयुक्तरित्या सर्वेक्षण करतात. त्यांच्या याच अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असून ते यादीत पाचव्या स्थानी आहेत. तसंच या यादीत पहिल्या क्रमांकावर बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. त्यांची लोकप्रियता ८२.९६ टक्के आहे. या पाठोपाठच छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेल बघेल हे दुसऱ्या स्थानावर असून त्यांना ८१.०६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर केरळचे मुखमंत्री पिनारायी विजयन हे ८०.२८ टक्क्यांनी तिसऱ्या आणि व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे ७८.५३ टक्कयांनी चौथ्या स्थानावर आहेत.
विशेष म्हणजे लोकप्रियतेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील मागे टाकलं आहे. केजरीवाल हे ७५ टक्क्यांनी सहाव्या स्थानी आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर बहुतांश लोकांनी ६६.२० टक्क्यांनी पंतप्रधान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २३.२१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे