गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (16:43 IST)

अहमदनगर : डीजेच्या जोरदार आवाजामुळे शिक्षकाचा मृत्यू

मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत .असे काहीसे घडले आहे श्रीगोंदा येथे.  श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने अशोक बाबूराव खंडागळे (58)हे शिक्षक कोमात गेले .
 
खंडागळे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात गेले असता तेथे मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्याचा त्यांना त्रास झाला. ते बेशुद्ध झाले.  श्रीगोंदा येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी  ते कोमात गेल्याचे सांगितले. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची प्राण ज्योत मालवली. 
 
काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोंडाणे येथे अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
 
 
 
Edited by - Priya Dixit