शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:21 IST)

अहमदनगरच्या श्रद्धाची युरोपियन स्पेस एजन्सीत निवड

Ahmednagar News भारतासाठी कौतुकास्पद असणारी बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्रद्धा गुंजाळ हीने नासात घेतलेल्या प्रशिक्षणानंतर आता तिला युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये जगभरातून निवडलेल्या सहा जणांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे भारतातून निवड झालेली श्रद्धा ही एकमेव भारतीय आहे. संगमनेर तालुक्यातील अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याच्या लेकीने साता समुद्रापार भरारी घेतली आहे.
 
बालपणापासूनच अंतराळाबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण असलेल्या श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. घरात मार्गदर्शन करणारे कोणी नसल्याने अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक माहिती वृत्तपत्रे व इंटरनेटच्या माध्यमातून जमवून तिने माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेरच्या सह्याद्रीच्या संस्थेत घेतले. स्वप्नपूर्तीचा पुढचा टप्पा सर्वच पातळ्यांवर कठीण होता. मात्र मुलगी श्रद्धा ही अभ्यासात हुशार असल्याने तिच्या आई-वडीलांनी तिला प्रोत्साहन दिलं.
 
संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर वसलेल्या खांडगावात भगवान गुंजाळ हे अल्पभूधारक शेतकरी पत्नी रोहिणी, मुलगी श्रद्धा व मुलगा साई यांच्यासह राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात शिक्षणासाठी इतका खर्च करून बाहेर कशाला पाठवायचे, तिच्या कमाईचा तुम्हाला काय उपयोग, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पचवून आई-वडिलांनी ठाम भूमिका घेतली आणि मुलीला शिक्षणात काही कमी पडू दिले नाही. श्रद्धाने मिळवलेल्या यशाने आई वडील आंनदी झाले असून आपल्या मुलीने देशाची सेवा करावी हे सांगताना अश्रू अनावर झाले होते.
 
श्रद्धाने बालपणापासून कल्पना चावलाला रोल मॉडेल ठेवत हवं साध्य केल आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉईड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत तिने पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक ॲस्ट्रॉईड शोधला. त्याला 2020 पीआर 13 नावही देण्यात आले. या संशोधनाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस व डॉ. अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस हे दोन सन्मान तिला मिळाले आहे. यातूनच ‘नासा’च्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅमसाठी केनेडी स्पेस सेंटर येथे तिची निवड झाली.
 
दरम्यान श्रद्धा च्या या यशासाठी तीला वेगवेगळ्या स्तरातून शुभेच्छा येत आहे. तसेच तिच्या यशाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धाची मागील महिन्यात युरोपियन स्पेस एजन्सीसाठी पोलंडमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, यात इटली, स्वित्झरलँड, जर्मनी, यूएसए, रशिया व भारत या सहा देशांचा समावेश आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाणाऱ्या यानांचा अभ्यास व त्यातील सिम्युलेटर्सवर काम करायची संधी तिला मिळणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor