बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (11:31 IST)

अजित पवार यांच्या हस्ते कोविड केअर सॉप्टवेअरचे प्रकाशन

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणार्‍या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केअर सॉप्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या या सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र पाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे.

या सॉफ्टवेअरबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व शैलेंद्र पाठक यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सॉफ्टवेअरच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले.