रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (08:16 IST)

अजित पवारांचा 'बारामती'वर दावा, सुप्रिया सुळेंना आव्हान देतायत की जागा सुरक्षित करतायेत?

ajit panwar supriya sule
प्राची कुलकर्णी
बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खुद्द अजित पवारांनीच रायगडमधील कर्जत इथे आयोजित पक्षाच्या मंथन शिबिरात केली.
 
बारामतीसोबतच रायगड, सातारा आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघांवरही दावा अजित पवारांनी केलाय. रायगडचे सध्याचे खासदार अजित पवार गटाचे सुनील तटकरेच आहेत, मात्र इतर तीन मतदारसंघात सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे, साताऱ्यात श्रीनिवास पाटील आणि बारामतीत सुप्रिया सुळे आहेत.
 
शरद पवारांच्या गटाला शह देत असतानाच अजित पवार भाजप आणि शिंदे गटाच्या जागा मागून त्यांच्यामध्येही संघर्ष सुरु करत आहेत का?
 
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणाऱ्या बारामतीमध्ये स्वत:चा उमेदवार देऊन बहीण सुप्रिया सुळेंची वाट बिकट करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे की बारामती मतदारसंघ भाजपच्या ताब्यात जाऊ न देता पवारांच्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे का, अशा अनेक प्रश्नांसह अजित पवारांच्या विधानामुळे चर्चा रंगली आहे.
 
अजित पवारांच्या विधानाचे अर्थ आपण या विश्लेषणातून जाणून घेऊ.
 
बारामती आणि भाजप
बारामती मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळवण्याचा भाजप गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. पवारांच्या ताकदीला त्यांच्या होम ग्राउंडवर सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप गेली अनेक वर्ष करत आहे.
 
1984मध्ये शरद पवार या जागेवरुन लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत ही जागा जनता पक्षाच्या ताब्यात गेली.
 
1991 मध्ये अजित पवार लोकसभेची निवडणूक लढले खरे. पण शरद पवारांना केंद्रात बोलावल्यावर राजीनामा देऊन पुन्हा राज्यात परतले.
 
1996 पासून आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी म्हणून ही जागा पवार कुटुंबाच्या ताब्यात राहिली आहे. शरद पवार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे बारामतीमधून खासदार आहेत.
 
2014पासून भाजपने या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत केलं. 2014 मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर लढलेल्या महादेव जानकरांना इथून चांगले लीड मिळाले. त्यांनी जवळपास 42 टक्के मतं मिळवली होती.
 
त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीत भाजपने कांचन कूल यांना रिंगणात उतरवलं. कांचन कूल यांच्यासाठी प्रचाराची धुरा आणि रणनिती सांभाळण्याची जबाबदारी होती तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर.
 
पाटलांनी तेव्हा बारामतीमध्ये मुक्काम ठोकला होता. तर अमित शहा यांनी प्रचारासाठी सभा घेतली होती. तर पाटलांनी या दरम्यान पवार विरोधकांची मोट बांधली होती.
 
पंतप्रधान मोदी यांनी मात्र बारामती दौरे केले ते पवारांच्या आमंत्रणावरुन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी.
 
2014 मध्ये प्रचारासाठी मोदींनी विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेल्या सभेत काका पुतण्याचं राज्य उलटवून टाका अशी हाक दिली.
 
2019 मध्ये भाजपने या मतदारसंघात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना जबाबदारी दिली. त्यांनी दोनवेळा बारामतीमध्ये सभा घेतली. त्याबरोबरच केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचाही दौरा झाला.
 
त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक नेत्यांनी बारामतीचे दौरे केले. पण अजित पवार भाजपमध्ये आले आणि त्यानंतर हे दौरे बारामती शहराच्या भोवती फिरत राहीले.
 
मतदारसंघात गेले तरी नेत्यांची बारामती शहरात हजेरी दिसत नव्हती. अर्थात बारामतीबाबत आपण गंभीर असल्याचा दावा मात्र भाजपकडून वारंवार केला जात होता.
 
इतकंच नाही तर विनोद तावडेंसह अनेक नेत्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी बैठकाही घेतल्या होत्या.
 
पण भाजप ही तयारी करत असतानाच आता अजित पवारांनी राष्ट्रवादी ही जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली आहे.
 
त्याबरोबरच अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांना देखील इथून रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. खरंतर सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड, भोर वेल्हा असे विधानसभा मतदारसंघ येतात.
 
यातल्या बारामती मतदारसंघातून त्यांना लीड मिळत असलं तरी दौंडमध्ये राहुल कूल, इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि आता अजित पवारांसोबत गेलेले दत्तात्रय भरणे, आणि काँग्रेसमध्ये असूनही पवारांशी आणि पर्यायाने सुळेंशी सख्य नसणारे संग्राम थोपटे यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
 
त्यातच बारामतीमध्ये अजित पवारांची ताकद अधिक आहे. पुरंदरमध्ये संजय जगताप सुप्रिया सुळेंसोबत दिसत असले तरी त्यातून त्यांना लीड मिळेल का याबाबत शंका आहे. शहरी भाग येणाऱ्या खडकवासला मतदारसंघात सध्या भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत.
 
रुपाली चाकणकरांना इथे आमदारकी लढवण्याची इच्छा आहे. या भाग जास्त भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे खडकवासल्यातून लीड मिळवण्यासाठी सुळेंना कष्ट करावे लागतील.
 
अशात जर सुनेत्रा पवार किंवा अजित पवार गटाचा दुसरा कोणी उमेदवार रिंगणात उतरला तर चित्र काय असेल?
 
सुनेत्रा पवार सक्रीय राजकारणात पदं भूषवत नसल्या तरी बारामती मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. अजित पवारांचा विधानसभेचा प्रचार त्या एकहाती सांभाळतात. इतकंच नाही तर एरव्हीही अगदी घराघरांमधूनही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा वावर असतो.
 
दत्तात्रय भरणेंमुळे इंदापूर, रमेश थोरातांमुळे दौंड या मतदारसंघांसह जिल्ह्यात अजित पवारांची ताकद आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवाराला ही निवडणूक तुलनेने सोपी जाऊ शकते.
 
पण यातून अजित पवार नक्की साध्य काय करु इच्छितात? सुळेंविरुद्ध उमेदवार देणार की त्यांची वाट सोपी करण्याचा हा प्रयत्न आहे?
 
सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांच्या मते, हा गोंधळ माजवण्याचा प्रयत्न आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना फडणीस म्हणाले, “बारामती अजित पवारांनी लढवली नाही तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार प्रचार करत बाहेर फिरतील. बारामतीमध्ये निवडणूक लढवून त्यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.”
 
तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार म्हणाले, “पहिली गोष्ट अशी की पवार घराण्याने आमचं नातं जास्त मोठं अशी भूमिका ठेवली आहे. पण समाजातून किंवा जवळच्या लोकांकडून कायम एक मुद्दा मांडला जातो म्हणजे अजित पवारांना मुख्यंमंत्रिपदाच्या बाबत डावललं गेलं. तो राग शरद पवारांबाबत दिसतो. अजित पवारांचा मुलगा राजकारणात येऊ इच्छितो. आईचा पाठिंबा आहे. त्यामुळे बारामती लढवणे म्हणजे सुप्रिया सुळेंसाठी ते सोयीचं करतायत असं म्हणता येणार नाही.”
 
अजित पवार विरुद्ध भाजप हा संघर्ष होणार का?
अजित पवारांनी शिंदे गटाचा उल्लेख न करता ज्या जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहेत आणि भाजपकडे नाहीत, अशा आणखी जागा आम्ही मागणार आहोत, असं स्पष्ट केलं आहे.
 
यातून मग भाजप विरुद्ध एक नवा संघर्ष निर्माण करण्याचा अजित पवार प्रयत्न करत आहेत का?
 
याबाबत बोलताना प्रकाश पवार म्हणाले, “भाजपला काऊंटर केलं जात नाही. बारामतीमध्ये टॅक्टिकल मुद्दा होता. सुप्रिया सुळे पराभूत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे अजित पवार गेल्याने भाजप यशस्वी झाला आहे शरद पवारांवर मात करायला.”
 
तर वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते, "अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. त्यामुळे ते आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच राज्यांमधल्या भाजपच्या ताकदीचं चित्र पाहता लोकसभेसाठी भाजपला महाराष्ट्र महत्वाचा आहे.
 
"या परिस्थितीमध्ये आपली ताकद वाढवून जास्त जागा निवडून आणून महत्वकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न अजित पवार करु शकतात. त्यातच भाजपसाठी बारामती महत्वाची असली तरी तिथे ताकदीचा उमेदवार भाजपने दिला नाही. त्यामुळे पाहुण्याच्या काठीने साप मारत आपल्या ताब्यात बारामती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या माध्यमातून करण्याची भाजपची रणनिती असू शकते."
 
शिरुर, सातारा आणि रायगडवरही दावा
बारामतीसोबतच अजित पवारांनी रायगड, शिरुर आणि साताऱ्यावर देखील दावा केला आहे. यातल्या शिरुर आणि रायगडमध्ये त्यांची ताकद आहे. तर साताऱ्यात मात्र उदयनराजे भोसले यांच्याशी थेट संघर्ष आहे. तिथे पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत.
 
या मतदारसंघांवर दावा करुन अजित पवार नक्की काय साध्य करु इच्छितात याबाबत सम्राट फडणीस म्हणाले, "शिरुरमध्ये देखील अमोल कोल्हेंनी अजित पवारांची साथ दिली नाहीय. तर साताऱ्यात त्यांना श्रीनिवास पाटलांना पाडायचे आहे. स्वत: उभारण्यापेक्षा दुसऱ्याला पाडणे हा जास्त उद्देश आहे.”
 
तर प्रकाश पवार यांच्या मते, “सातारा अजित पवारांनी मागितला तरी तो अजित पवारांना अवघड जाईल. कारण उदयनराजे यांच्याशी त्यांचा संघर्ष आहे. तिथे तिकीट द्याचं म्हणलं तर रामराजे निंबाळकरांना तिकीट मिळेल. आणि तो मतदारसंघच साताऱ्यात मोडत नाही. उरलेली माणसं विधानसभेपुरती मर्यादित असतील. रायगडमध्ये तटकरे, उद्योग व्यवस्था याचं नियंत्रण आहे. त्यामुळे इथे दावा करणं योग्य आहे. शिरूरमध्ये ताकद आहे. तिथे उमेदवार आहे. चार जागांची मागणी केली तरी पार्थ पवारांसाठी एक मतदारसंघ आणि तटकरेंसाठी रायगडसाठीची मागणी मान्य होऊ शकते.”
 
अजित पवारांची नेमकी रणनिती काय?
या जागांशिवाय आणखी जागाही मागणार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.
 
सम्राट फडणीस यांच्या मते , "अजित पवार तीन आठवडे गप्प होते. त्यांच्या केडरला कार्यक्रम द्यायला हवा आहे. एवढंच त्यांचा उद्देश दिसतो आहे.”
 
तर प्रकाश पवार यांच्या मते मात्र हा जागावाटपातल्या बार्गेनींगचा भाग आहे.
 
प्रकाश पवार म्हणाले, "खासदारकीची निवडणूक भाजप स्वतंत्र चिन्हावर लढवू देईल का याबाबत शंका आहे. भाजपच्या तिकिटावर लढवण्याची ऑफर मिळू शकते. अजित पवारांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. हा बार्गेनिंगचा भाग आहे.”
 
उमेदवारी कोणाला?
बारामती मतदारसंघात सध्या सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल निवडणूक लढल्या होत्या. त्याबरोबरच यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या म्हणजे अंकिता पाटीलच्या नावाचीही चर्चा होते आहे.
 
तर अजित पवार गटाकडून पार्थ किंवा सुनेत्रा पवार उमेदवार असू शकतात. अशा परिस्थीतीमध्ये शरद पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात, अशीही चर्चा सुरु आहे.
 
शिरुरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मुळात ही जागा शिवसेनेची असली तरी आता इथले माजी खासदार आणि नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात गेले आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचीही चर्चा आहे.
 
त्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील आणि पूर्वा वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा होते आहे. शिरुरसाठी भाजपकडून महेश लांडगे तर राष्ट्रवादीकडून विलास लांडे देखील इच्छूक आहेत.
 
सातारा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीकडून लढले. त्यांच्या विरोधात भाजप अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव होते. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध सेना भाजपचे नरेंद्र पाटील अशी निवडणूक झाली.
 
त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर इथे पोटनिवडणूक लागली ज्यात श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. येत्या निवडणूकीत इथेही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होताना श्रीनिवास पाटील विरुद्ध रामराजे निंबाळकर अशी होण्याची शक्यता आहे.
 
तर रायगड मतदारंघात सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते अशीच लढत होत आली आहे. 2014 मध्ये गीते तर 2019मध्ये तटकरे इथून निवडून आले होते.
 
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे किंवा अदिती तटकरे, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अनंत गीतेच निवडणूक लढण्याची शक्यता आहे.