अजित पवारांची घोषणेवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
बारामतीसह, शिरूर, सातारा, रायगड या चार लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा अजित पवार गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाची वैचारिक मंथन शिबिर संपन्न झाली. या शिबिरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
बारामती, शिरूर आणि सातारा या लोकसभेच्या जागेवर शरद पवार गटाचे खासदार आहेत. तर रायगडमधून सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे नेते खासदार आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे, सातारामध्ये श्रीनिवास पाटील तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे हे लोकसभेसाठी प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे अजित पवार गटाच्या नव्या राजकिय खेळीनुसार या जागांवर आता त्यांचेही उमेदवार असतील. त्यामुळे सध्यातरी या चार मतदारसंघामध्ये पवार विरूध्द पवार अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना अजित पवार गट म्हणाले, “ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा आहेत त्या आपण लढवणारच….त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यापैकी ज्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदेंशी चर्चा करून जागा वाटप करता येईल.” असे अजित पवारांनी म्हटले आहे.
अजित पवारांच्या या घोषणेनंतर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Edited by -Ratnadeep Ranshoor