लग्नात इतक्या जोरात नवरीकडे अक्षता फेकल्या की लग्न मोडलं, वऱ्हाड भिडलं
- स्वाती पाटील
सध्या सगळीकडे लग्नसराईचा मौसम सुरू आहे. डोक्याला मुंडावळ्या बांधून मंडपात उभे राहिलेल्या वर वधूला आशिर्वाद म्हणून वऱ्हाडाकडून अक्षता टाकल्या जातात. हा आशिर्वाद घेऊन या जोडप्याच्या नवीन आयुष्याला सुरूवात होते. पण या अक्षतांनीच एका जोडप्याचा हा नवा प्रवास सुरू होता होता थांबवला.
सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात बोरगावात ही अजब घटना घडली. बोरगाव इथल्या एका लग्नात नवरीवर अक्षता फेकून मारल्याच्या कारणावरून दोन्हीकडची मंडळी एकमेंकाना भिडली आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. आणि एक ठरलेलं लग्न भर मांडवात मोडलं
बोरगाव इथल्या पाटेश्वर नगरमध्ये कुबेर छाया मंगल कार्यालयात थाटामाटात हा विवाह सुरू होता. मुहूर्तावर लग्नविधी पार पडत होत्या. मुलीचे मामा मुलीला लग्नमंडपात घेऊन आले. वर आणि वधू मंगलाष्टकासाठी उभे राहिले. नवरा नवरीच्या आजूबाजूला करवल्या आणि करवले उभे होते.
लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडी पाहुण्या मंडळींना अक्षता म्हणून तांदूळ वाटण्यात आले. मंगलाष्टकांना सुरूवात झाल्यावर नवीन जोडप्यावर आशिर्वादरूपी अक्षता टाकल्या जात होत्या. इथंवर सगळ सुरळीत सुरू होतं.
पण दोन मंगलाष्टका झाल्यानंतर तिसरी मंगलाष्टक अचानक थांबली. आणि स्टेजवरच वरवधूचे कुटूंबीय एकमेंकांना भिडले. जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाली.
याचं कारण म्हणजे नवऱ्याच्या मागे उभे असलेल्या करवल्यांनी नवरीला अक्षता फेकून मारल्या. नवरीच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीच्या मामाने असं करू नका असं सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. पण यातून शाब्दीक वाद वाढत गेला. आणि मुलीच्या मामाच्या कानशिलात लगावण्यात आली. यानंतर एकच गोंधळ सूरू झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की, वर आणि वधू या दोन्ही घरातील मंडळींमध्ये जोरदार राडा सुरू झाला. बाचाबाची, गोंधळ, हाणामारी आणि किंचाळ्या यातच हा समारंभ आटोपता घ्यावा लागला.
पण हे प्रकरण इथंवर थांबलं नाही. हाणामारी आणि ढकलाढकली नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळींनी थेट पोलीस ठाणं गाठलं.
प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत
बोरगाव पोलीस ठाण्यात या मंडळींनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे. वधूच्या घरच्यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. तर वराच्या घरच्यांनी शिवीगाळ आणि अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे.
यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकायला तयार नव्हतं. त्यामुळं अखेर हे लग्न मोडण्यात आले.
लग्नात हौसेखातर अनेक नवनव्या गोष्टी केल्या जातात. त्यातून वादाचे प्रसंग घडतात. पण ज्येष्ठ मंडळी एकत्र येत त्यावर वेळीच तोडगा काढत सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात.
पण सातारा इथं घडलेल्या या घटनेमुळे एक संसार सुरू होता होता थांबला. त्यामुळं मजा म्हणून काही गोष्टी करताना सगळ्यांनीच भान राखायला हवं, असा सूर आता परिसरात ऐकायला मिळत आहे.