सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (10:23 IST)

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार

नवरात्र म्हणजेच घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे येत्या 7 ऑक्टोबर पासून उघडणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
 
ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती.आता घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडली जाणार आहेत. 
 
मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यापूर्वी राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असे म्हटले होते.त्यानंतर राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडली जाणार.मात्र भाविकांना कोरोना विषयक नियमांचे पालन करावे लागणार असे म्हटले आहे.
 
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सेनेटाईझरचा वापर केलाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
7 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस आहे. त्या निमित्ताने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.