बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (08:37 IST)

वेरुळ, अजिंठा लेणीसह सर्व पर्यटन केंद्र उघडणार

कोरोना विषाणू प्रसाराची गती काहीशी स्थिरावल्याने औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असणारी वेरुळ आणि अजिंठा लेणीसह सर्व पर्यटन केंद्र गुरुवारपासून उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
 
जिल्हाधिकरी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.  पर्यटनस्थळी वाटाडे (गाइड) म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची तत्पूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. तसेच पर्यटनस्थळाचे र्निजतुकीकरण करणे बंधकारक करण्यात आले आहे.
 
गेल्या दहा महिन्यांपासून लेणी बंद असल्याने त्या भागात साप किंवा सरपटणारे प्राणी किंवा अन्य वन्यजीव आले आहेत का, याची पाहणी केली जाणार असून पर्यटनस्थळावर निगा राखणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
 
दररोज दोन सत्रात प्रत्येकी एक हजार पर्यटकांना ऑनलाइन तिकीट उपलब्ध होणार आहे. थेट तिकीट केंद्रावर तिकिटे मिळणार नाहीत. वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच बीबी का मकबरा, पाणचक्की तसेच औरंगाबाद लेणींचाही समावेश या निर्णयामध्ये आहे.