मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:28 IST)

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

amit thackeray
facebook
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात हे आपलं ” राज्यगीत” लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी विनंती ‘ असे अमित ठाकरे यांनी पत्रात लिहीले आहे.
 
काय आहे अमित ठाकरे यांचे पत्र?
जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..." ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे 'राज्य गीत' असा दर्जा देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच लावले जावेच हा आमचा आग्रह आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढयांना विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे.
 
त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..." हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे, अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor