मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (20:19 IST)

अमरावती : ईदच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणं, दोघांना अटक

arrest
अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात महावीर चौक ते पेंशनपुरा परिसरातून ईद निमित्त जुलूस काढण्यात आला होता. शेखापुरा नगरातून निघालेल्या या जुलूस मध्ये 'गुस्ताखी नबी की सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा' हे गाणं डीजेवर वाजवण्यात आलं. सोबतच जुलूसमध्ये सामील नागरिकांनी आक्षेपार्ह घोषणाही दिल्या. पोलिसांनी याप्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष टाले यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शेखपुरा मंडळाचे हे जुलूस होते, मंडळात सामील प्रमुख व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती टाले यांनी दिली.
 
यानंतर परतवाड्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात लावण्यात आलेले झेंडे काढण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
 
आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांविरोधत कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. ते म्हणाले, "मिरवणुकीत जल्लोष सोडून दुसऱ्याला जिवे मारण्याची मानसिकता चुकीची आहे. दुसऱ्याचा जीव घेण्याच्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतो. हे सगळे लोक PFI शी निगडीत आहेत. ही मानसिकता मुस्लिमांमध्ये पसरवत आहेत. सोबतच हिंसाचाराचं समर्थन करणारे लोक आहेत. यांना थांबवण्यासाठी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी."
याबदद्ल माहिती देताना अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाथ बारगड म्हणाले, "9 तारखेला ईदची मिरवणूक परतवाडा येथे चालू असताना त्यात काही आक्षेपार्ह गाणी वाजवण्यात आली. याबद्दल परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे."
 
तर नेत्यांनी सामाजिक भान ठेवलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
 
"सध्या देशातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण कलुशित झालेलं आहे. सत्तेसाठी संविधानाच्या पलीकडे जाऊन सत्ता हस्तगत करण्याचे प्रकार सुरू आहेत. देशामध्ये स्थिरता नाही, अशा वेळी सामाजिक नेत्यांनी भान ठेवलं पाहिजे. सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडू नये, याच भान ठेऊन आपले उपक्रम, कार्यक्रम राबवले पाहिजे. अशा द्वेशामधून, रागातून किंवा संतापाने जी धर्मांधता दाखवतो त्यामुळे सामान्य माणसाचं नुकसान होतं. हे जर टाळायचं असेल तर भान ठेवलं पाहिजे, पण सामाजिक सलोखा बिघवण्याच जर कुणी काम करत असेल मग तो कोणत्याही जातीचा असो त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस काँग्रेस किशोर बोरकर यांनी दिली आहे.
 
गेल्या काही काळापासून अमरावती शहरात हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणाऱ्या काही घटना घडल्या आहेत. नुपूर शर्मा प्रकरणानंतर अमरावतीमध्ये एका औषधविक्रेत्याची हत्या करण्यात आली होती.
 
औषधी दुकानाचा व्यवसाय असलेले उमेश कोल्हे 'ब्लॅक फ्रिडम' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य होते. या ग्रुपमध्ये हिंदुत्ववादी स्वरूपाच्या पोस्ट जास्त शेयर व्हायच्या. काही दिवसांपूर्वी उमेश कोल्हेंनीसुद्धा नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारी एक पोस्ट इथे टाकली होती.
 
अमरावती पोलिसांना संशय आहे की हीच पोस्ट ग्रुपच्या बाहेर व्हायरल झाली असावी किंवा कोल्हे यांच्या हातून चुकून एका मुस्लिम ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यामुळे उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला झाला होता.
त्याआधी 12 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या हिंसाचारानंतर 1 आठवडा अमरावती शहर बंद होतं.
 
जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती शहरात एक आठवडा संचारबंदी लागू केली होती. तसंच शहरात चार दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं होतं.
Published By- Priya Dixit