मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मे 2022 (21:15 IST)

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे होणार माफीचा साक्षीदार

anil deshmukh
कोणत्याही गुन्ह्यांमध्ये पोलिस तपास सुरू असताना अनेक अडचणी येतात. गुन्हेगाराचा शोध लागण्यासाठी पोलिस कसून चौकशी करतात, त्यानंतर खटला सुरू होतो तेव्हा काही वेळा पुरेसे पुरावे हाती लागत नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार बनविले जाते. माफीच्या साक्षीदाराची भूमिका कोणत्याही खटल्यामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे एकेकाळी माफीचा साक्षीदार हा चित्रपटदेखील गाजला होता.
 
सध्या देखील अशाच एका प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे ती म्हणजे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.
 
विशेष म्हणजे सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी आणि कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तसेच कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. त्याचप्रमाणे पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरे जावे लागणार नाही.
 
मागील वर्षी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे आधी प्रकरण खूपच गाजले होते त्यातच वाझेंनी सक्तवसुली संचालनायकडेही (ईडी) अशीच विनंती केली होती. त्यानंतर ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आपण माफीसाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती उघड करण्यास तयार असल्याचे वाझे यांनी सांगितले होते.
 
भ्रष्टाचाराप्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना सीबीआयने अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेंनी आपले वकिल रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. सचिन वाझेंनी आपल्या अटकेनंतर सीबीआयने पूर्णपणे तपास केला असून आपण त्यांना तपासात सहकार्य केल्याचं सांगितले आहे. सचिन वाझेंनी तपास अधिकाऱ्यांना आपण स्वच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यानंतर, न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवला असून याला खटल्यादरम्यान पुराव्याचे मूल्य जास्त आहे.
 
सध्या तरी सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती, पुरावे देण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमके पुढे काय घडते याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.