शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (13:05 IST)

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई. मुंबईतील विशेष सुटी न्यायालयाने शनिवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांच्या पुढील नऊ दिवसांच्या कोठडीची विनंती केली. मात्र न्यायालयाने तपास यंत्रणेची याचिका फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी देण्याची मागणी अंमलबजावणी संचालयाने केली होती. 
12 तासांच्या चौकशीनंतर सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना ईडीने अटक केली. मंगळवारी न्यायालयाने त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. ईडीची कोठडी संपल्यानंतर देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हा गुन्हा दाखल केला होता. या आधारे देशमुख व इतरांविरुद्ध नंतर मनी लॉन्ड्रिंग चा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीबीआयने 21 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चौकशी सुरू केली होती. सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यामार्फत4.70 कोटींहून अधिक रक्कम गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही अटक केली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.