शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: वेळापूर , बुधवार, 18 मार्च 2020 (16:35 IST)

अर्धनारी नटेश्वराची यात्रा रद्द

कोरोनो व्हायरस व त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गर्दी टाळण्यासाठी वेळापूर (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत असलेल्या सुप्रसिद्ध श्री अर्धनारी नटेश्र्वर देवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
वेळापूर पोलीस स्टेशनला सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी बैठक बोलावली होती. यावेळी कावडीचे मानकरी व देवाचे पुजारी उपस्थित होते. 
 
वेळापूर येथे श्री अर्धनारी नटेश्वराचे पुरातन मंदिर आहे. 12 व्या शतकात दौलताबादचे राजे रामदेवराय यादव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून चैत्र शुध्द प्रतिपदा ते व अष्टमी अशी सुमारे 22 दिवासांच्या कालावधीत ही यात्रा भरते. याचे मुख्य आकर्षण म्हणजे देवाच्या हळदी, विवाह सोहळा व वरात हे कार्यक्रम असतो. चैत्री पाडव्याला म्हणजे बुधवार 25 मार्च रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. रविवार 29 रोजी सायंकाळी 4 वाजता देवाच्या हळदी, बुधवार 1 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता देवाचा विवाह सोहळा, 8 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता साडे, त्यानंतर देवाची पालखी व कावडी मिरवणूक (वरात) तर बुधवार, 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व सायंकाळी 7 वाजता जागरण गोंधळ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
 
सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रा, जत्रा, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमावर बंदी घातली आहे. याबाबतची माहिती वेळापूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिली. पाडव्यापासून निघणारी कावडीची मिरवणूक काढू नये. देवाचे धार्मिक कार्यक्रम फक्त पुजार्‍यांनी करावेत. कोठेही पाच पेक्षा अधिक लोक जमा होतील अशा कार्यक्रमाचे आयोजन करु नये. असे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.