रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (21:09 IST)

नाशिकमधून सहा महिन्यात तब्बल ९५६ मुली व महिला बेपत्ता

missing
नाशिक शहरात जानेवारी ते ८ मे २०२३ या कालावधीत तब्बल ९५६ मुली व महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९५६ पैकी २२१ अल्पवयीन मुली आहेत. तर १८ वर्षांपुढील महिला तब्बल ७३५ आहेत.
 
पोलिसांना अवघ्या ३१ अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. उर्वरित बेपत्ता मुली व महिलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (अॅण्टी ह्युमन ट्रॅफिक युनिट), मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. 
 
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च मध्ये ३९० ने वाढ झाली आहे. राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असून, बेपत्ता होणाऱ्या मुली १८ ते २५ वयोगटातील आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्येही बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. 
 
बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी नाशिक शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहेत. यापैकी काही तरुणी आणि महिला लग्न करून घरी परतल्या आहेत. ज्या महिला आता घरी परतल्या आहेत, त्या स्वतंत्र जीवन जगू इच्छित होत्या. त्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक महिलांना घरातील रुढी, परंपरा मान्य नसल्याने, त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
महिला बेपत्ता होण्याची काही कारणे देखील समोर आली आहेत. नोकरी, लग्न, कौटुंबिक कलह, सोशल मीडियाचा अतिवापर, प्रियकराकडून लग्नाचे अमिष, विवाहबाह्य संबंध, प्रेमाची आमिष दाखवून मुलींची दिशाभुल केली जात असून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जाता आहेत.
 

Edited By- Ratnadeep Ranshoor