शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (08:20 IST)

प्रताप सरनाईकांना तुरुंग दिसू लागताच मुख्यमंत्र्यांची आठवण; किरीट सोमैय्या यांचा टोला

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपशी जुळवून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच भाजपशी जुळवून घेतल्यावर रविंद्र वायकर,अनिल परब आणि स्वतः सरनाईक यांना होणारा नाहक त्रास कमी होईल असे पत्रात म्हटलं आहे. यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी टीका केली आहे. प्रताप सरनाईक यांना तुरुंगाचे दरवाजे दिसायला लागल्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले असल्याचे सोमैय्या यांनी म्हटलं आहे.
 
आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत व्हिडओ शेअर केला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी MMRDA घोटाळा केला आता त्यांना तुरूंगाचे दरवाजे दिसत आहेत म्हणून आरोग्य यंत्रणेवर ओरोप करत आहेत. असं वक्तव्य किरीट सैमय्या यांनी केलं आहे. तसेच अनिल परब यांनी वाळूवर रिसॉर्ट बांधला आहे तो पडणार ते सुद्धा जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरेंची सेना कोव्हिडमध्ये करप्शन करणारी सेना आहे. शिवसेनेतील अर्धा डझन नेत्यांना तुरूंगात जावे लागणार आहे असा टोला किरीट सोमैया यांनी प्रताव सरनाईक तसेच अनिल परबसह संपुर्ण शिवसेनेला लगावला आहे.
 
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी डिसेंबर २०२० मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधली असल्याचा आरोप केला आहे. सरनाईक यांनी बांधलेल्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. तसेच ही इमारत अनधिकृत आहे. यावर किरीट सोमैय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच एमएमआरडीएमध्ये बोगस टॉप्स सुरक्षारक्षकांची निम्मी रक्कम ही आमदार प्रताप सरनाईक यांना जात असल्याचा आरोपही प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला आहे. कल्याण तालुक्यातील ७८ एकर जमीन खरेदी केल्याचा व्यवहार केला आहे. तसेच त्यावर ईडीची जप्ती असूनही व्यवहार पुढे सुरुच असल्याचा आरोपही किरीट सोमैय्यांनी केला आहे.