गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (13:31 IST)

आषाढी वारी इतिहासात अनेक वेळा मर्यादित स्वरुपात झाली आहे

- श्रीरंग गायकवाड
संत तुकाराम महाराज चौदाशे वारकऱ्यांसह पंढरीची नियमित वारी करत. पण एका साली आजारपणामुळे पंढरीच्या वारीला त्यांना जाता आलं नाही. तेव्हा तुकोबांनी एका वारकऱ्यासोबत देवाला 24 अभंगांचे पत्र दिले होते.
 
का माझे पंढरी न देखती डोळे।
 
काय हे न कळे पाप त्यांचे।।
 
पाय पंथ का हे चलती न वाट।
 
कोण हे अदृष्ट कर्म बळी।।
 
देवाला भेटता न आल्याने तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेली व्याकुळता मनाला पीळ पाडणारी आहे.
 
अशीच वेदना यावर्षीही लाखो वारकऱ्यांच्या मनाला झाली. कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 वर्षं वारी रद्द करावी लागली आहे. संतांच्या पादुका थेट पंढरपूरला जात आहेत.
 
पण वारीशिवाय महाराष्ट्र तो कसा असेल! समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी तर अशी व्याख्या केली आहे की, 'ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र!'
 
महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या पंढरीची वारी करणारी घराणी आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात,
 
माझ्या वडिलांची मिराशी गा देवा।
 
तुझी चरणसेवा पांडुरंगा।।
 
आधुनिक काळातील साहित्यिक भालचंद्र नेमाडे आपल्या एका कवितेत 'विठू पारंबीला चिकटला' असं म्हणतात. म्हणजे वारीची वडिलांची परंपरा न सांगता आपोआप मुलगा चालवतो.
 
पंढरीची ही वारी तेराव्या शतकातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांच्या अगोदरही होत असल्याचे दाखले मिळतात. मूळचे मराठवाड्यातील असलेल्या संत नामदेवांच्या घराण्यातही अनेक पिढ्यांची पंढरीची वारी होती. तर संत ज्ञानदेवांचे आजोबा त्र्यंबकपंतही पंढरीची वारी करत होते. संत तुकोबारायांपूर्वी त्यांच्या 7 पिढ्या पंढरीची वारी करत होत्या.
 
वारीवरची संकटं - तंटा आणि दुष्काळ
एवढी मोठी परंपरा असलेल्या वारीने आतापर्यंत अनेक सुलतानी, आस्मानी संकटे झेलली आहेत.
 
तुकोबांचे थोरले सुपुत्र हभप नारायण महाराज यांनी सुमारे 1680पासून श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून आणि 'ज्ञानोबा-तुकाराम' भजन करत पंढरीची सामूहिक पायी वारी सुरू केली.
 
1830च्या दरम्यान म्हणजे तुकोबारायांच्या वंशजांमध्ये पालखीच्या मालकी आणि सेवेच्या प्रश्नावरून तंटा सुरू झाला. त्यामुळे मराठेशाहीतील शिंदे घराण्याचे सरदार हैबतरावबाबा आरफळकर यांनी स्वतंत्रपणे 1832च्या पुढे श्री ज्ञानदेवांची पालखी पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली.
 
वारकऱ्यांच्या या मेळ्याला वाटेत दरोडेखोरांनी वगैरे त्रास देऊ नये आणि त्यांना काही सुविधा मिळाव्यात म्हणून अंकली येथील एक सरदार शितोळे यांनी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याला हत्ती, घोडे, जरी पटक्याचे निशाण आदी गोष्टी दिल्या. हत्ती वगळता या गोष्टी आजही दिल्या जातात.
 
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील इतरही ठिकाणांहून अन्य संतांच्या पालख्या पंढरीच्या आषाढी वारीला येण्यास सुरुवात झाली.
 
इतिहास अभ्यासक संजय सोनवणी सांगतात, "जेव्हा जेव्हा दुष्काळ पडले, तेव्हा तेव्हा वारीवर परिणाम झाला आहे. वारकरी हे मुख्यतः शेतकरी, पशुपालक असल्याने त्यांना दुष्काळामुळे वारीला जाता आलेले नाही. उदा. संत तुकाराम महाराजांच्याच काळात 1630मध्ये दुर्गाडीचा प्रसिद्ध दुष्काळ पडला होता. इ.स. 1296 ते 1307 या काळातही मोठा दुष्काळ वारकरी पंढरीला जाऊ शकले नसावेत."
 
वारीवरचं संकटं - महायुद्ध आणि प्लेग
पुढे ब्रिटिशकाळातही या सामूहिक वारीमध्ये बाधा आली होती. सोनवणी सांगतात, "1942-45च्या दरम्यान पहिले महायुद्ध आणि 'चले जाव' चळवळ यामुळे ब्रिटिशांनीच सामूहिक वारीवर बंदी घातली होती. त्याच प्रमाणे प्लेगच्या साथीचाही मोठा तडाखा विशेषतः पुण्यातून जाणाऱ्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला बसला होता. अर्थात विदर्भ, मराठवाड्यात त्यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव फारसा नसल्याने त्या भागातील वारकरी पंढरपूरला वारीसाठी आले होते."
 
संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज आणि शेडगे दिंडी क्रमांक 3 चे प्रमुख जयसिंगदादा मोरे सांगतात, "1912मध्ये प्लेगच्या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. त्या साली तानुबाई देशमुख, सदाशिव जाधव आणि रामभाऊ निकम यांनी अनुक्रमे 13 जून 1945 आणि 25 जून 1945 रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंडी नेण्याची परवानगी मागितली होती. परंतु मुंबई सरकारने पालखी सोहळ्यावर बंदी घातल्याचे नमूद करून त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती."
 
त्यावेळच्या प्रोसेडिंगमध्ये याबाबतची केलेली नोंद जयसिंगदादा दाखवतात.
 
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे म्हणाले, "दर शंभर वर्षांनी आपल्याकडे सध्याच्या कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती येत असल्याचा इतिहास आहे. 1920 ते 1942 या दरम्यान आपल्याकडे प्लेगची साथ होती. यामुळे 1942 मध्ये पालखी सोहळा पंढरपूरला गेलाच नाही. वारी प्रातिनिधिकरीत्या तरी व्हावी म्हणून देहूतून पाच लोक संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन सायकलवर पंढरपूर वारीला गेले. त्यामध्ये बाबासाहेब इनामदार, गोविंद हरी मोरे, बबन कुंभार आदींचा समावेश होता. पंढरपूरला पोहोचण्यास त्यांना तीन दिवस लागले. तुकोबारायांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान, एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घडवून, द्वादशी सोडून ही मंडळी परतली."
 
आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख अभय टिळक म्हणाले, "कोरोनाच्या साथीमुळे यंदा पालखी सोहळ्याच्या वैभवापेक्षा सोहळ्याचं पावित्र्य जपलं जावं, असा प्रयत्न होता. पंढरपूरच्या आषाढी वारीला महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख 7 पालख्यांपैकी जळगावहून संत मुक्ताबाई, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, पैठणहून संत एकनाथ, सासवडहून जाणाऱ्या संत सोपानकाका आदी पालखी सोहळ्यांनी कोरोनाग्रस्त वातावरण बघता संतांच्या पादुका गाडीतून पंढरपूरला नेण्याचे ठरवलं."
 
'आग्रही आहोत, दुराग्रही नाही'
पायी वारी केल्याने 'काया, वाचा, मने' देवाची भक्ती होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पंढरपूर किंवा अन्य संतांच्या गावाला वाऱ्या अर्थात येरझाऱ्या करणे हा महत्त्वाचा भाग या भक्ती पंथात सांगितला गेला आहे.
 
समाजातील सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होऊन, समता, बंधुभावाने समाज एकत्र राहावा, ही या सामूहिक भक्तीमागची भावना आहे. त्यामुळे संतांच्या गावाहून पालखी, दिंडी निघण्यापासून ते वाटेने भजन, भोजन, कीर्तन, प्रवचन, रिंगण, पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेत स्नान, पुंडलिक दर्शन, उराउरी भेट, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन ते परतण्यापूर्वी होणाऱ्या गोपाळकाल्याचा अर्थात दहीहंडीचा प्रसाद एकमेकांच्या मुखात भरविणे या सर्व गोष्टी समूहाने, गोळ्यामेळ्याने करावयाच्या असतात.
 
यावर्षी यातलं काहीच होऊ शकलं नाही. पण त्यामुळे वारकऱ्यांनी उदास होऊ नये, असं श्री ज्ञानेश्वर महाराजांचे परंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार म्हणतात. पोलिसांप्रमाणे लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेल्या पालखी सोहळ्याला शिस्त लावणारे राजाभाऊ म्हणतात, "वारकरी वारीबाबत आग्रही जरूर आहे, पण दुराग्रही नाही. वारी करणे ही जशी शारीरिक साधना आहे, तशी ती मानसिकही साधना आहे. त्याला प्रमाण देणारे अभंग संतांनी लिहून ठेवले आहेत. त्यात
 
ठायीच बैसोनी करा एकचित्त।
 
आवडी अनंत आळवावा।।
 
असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यातील संदेश वारकरी बांधवांनी घ्यावा."