शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (09:41 IST)

महिलांना अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला

महिलांना व्हाट्सअपवर अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या एका आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आल्याने न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.
 
संपत राम शंकरराम (रा. मेघवालों की बस्ती, गांव बारना, ता. मिलाडा, जि. जोधपुर, राजस्थान सध्या रा. सुभाष पॅनकार्ड क्लबरोड, चहाचे दुकान, रामदेव सुपरमार्केट जवळ, बाणेर, पुणे) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका महिलेला दोन वेगवेगळ्या व्हॉट्सअप नंबरवरुन अश्लील मॅसेजेस व अश्लील व्हिडीओ कॉलींग केले होते. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून वाकड पोलिसांनी तांत्रिक माहिती काढून आरोपीला 30 मे रोजी अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पीडित महिलेला व्हिडीओ कॉल करून विनयभंग केल्याची कबुली दिली.
 
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल फोन, पाच सिमकार्ड जप्त केले. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली. अशा प्रकारचे कृत्य झाले असल्यास महिलांनी तक्रार देण्याचे पोलिसांनी आवाहन केले होते. त्यानुसार दोन महिलांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हाही दाखल केला होता.
 
त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. वरील तिन्ही गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी आरोपीने शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी आरोपीचा जामीन फेटाळला. या गुन्ह्यात सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी काम पाहिले. पोलिसांनी केलेल्या तपासाचे न्यायालयाने कौतुक केले आहे.
 
आरोपी ‘असा’ करायचा गुन्हा
 
आरोपीचे चहाचे दुकान होते. त्याच्याकडे येणारे गरीब लेबर त्याच्या दुकानात मोबाईल चार्जिगला लावुन कामाला जात होते. त्यापैकी साधे मोबाईल ज्यामध्ये व्हॉट्सअप नसते अशा मोबाईल नंबरचे व्हॉट्सअप आरोपीने त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये चोरुन घेतले होते. त्यावरून तो महिलांना अश्लील मेसेजेस आणि व्हिडीओ कॉल करत होता.
 
तो पूर्वी एका फर्निचरच्या दुकानात काम करीत होता. त्यावेळी दुकानात आलेल्या कस्टमरचे नंबर त्याने स्वतःकडे ठेवलेले होते. त्या नंबरवर तो अशा प्रकारे कॉलींग करुन त्यांना त्रास देत असायचा.