मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (12:48 IST)

वाकड पोलिसांनी पकडले साडेसहा टन रक्तचंदन; तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पुण्यातील वाकड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 
हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांचे चार साथीदार फरार असून त्यातील दोघेजण दुबई येथील आहेत.
 
निलेश विलास ढेरंगे (वय 35, रा. मु. पो. पिपंळगाव देपा, संगमनेर, अहमदनगर), एम. ए. सलिम (वय 43, रा. नंबर 62 जोग रोड कारगल कॉलनी, ता. सागर, जि. शिमोगा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय 45, रा. नाईक चाळ, एमजीम हॉस्पीटल शेजारी कातकरवाडी, नौपाडा, कळंबोली, नवी मुंबई), झाकीर हुसेन अब्दुलरेहमान शेख (वय 50, रा. एफ/जी/1 चिता गेट, ट्रॉम्बे, मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय 36, रा. मॅकडोनल्डजवळ, कळंबोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस नाईक वंदु गिरे आणि पोलीस हवालदार राजेंद्र काळे 12 मे रोजी पेट्रोलिंग करत होते. व्हीजन मॉल ताथवडे येथे त्यांना एक पांढ-या रंगाची मारुती 800 कार दिसली. त्या कारला पुढे नंबर प्लेट नव्हती व मागील नंबर प्लेट ही अर्धवट तुटलेली होती. काहीजण कार जवळ थांबले असल्याने कारचा पोलिसांना संशय आला.
 
पोलिसांनी त्यातील तिघांना पकडले आणि त्यांच्याकडे विचारणा केली. दरम्यान पकडलेल्या तिघांच्या मागे थांबलेले दोघेजण अंधारात पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी  उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर निलेश ढेरंगे याच्या मोबाईल फोनची पाहणी केली असता त्यात रक्त 
चंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसले.
 
आरोपींनी रक्तचंदन चोरुन रक्तचंदनाने भरलेला ट्रक (एम एच 40 / ए के 1869) निलकमल हॉटेल समोरील मोकळ्या जागेत ताथवडे येथे उभा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रक जवळ जाऊन पाहणी केली. ट्रकमध्ये पिवळसर रंगाचे स्पंज (फोम) शीट्सच्या पाठीमागे सुमारे पाच ते सहा फुटाचे गोलाकार रक्त चंदनाचे 6.420 टन वजनाचे लाकडी ओंडके आढळले.