बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (13:29 IST)

मोक्कातील तीन फरार आरोपींना अटक; काडतुसांसह दोन पिस्तुल, दोन कोयते जप्त

पुण्यात मोक्का (महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. हे गुन्हेगार कारवाई झाल्यापासून फरार होते. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.
 
हैदर जावेद सय्यद (वय 28, रा. पिंपळे गुरव), दीपक भीमराव सगर (वय 21), प्रथमेश ऊर्फ सोन्या यशवंत सावंत (वय 20, दोन्ही रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हैदर आणि त्याचे साथीदार आरोपी सगर व सावंत हे तिघेजण पवनाघाट स्मशानभूमी, काळेवाडी येथे थांबले असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत. तसेच ते पुन्हा भांडणे करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले.
 
तिन्ही आरोपींकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. 11) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 
आरोपी हैदर सय्यद याच्या विरोधात वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि निगडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपी सावंत याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी सगर याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.