शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (09:40 IST)

महाराष्ट्र पोलीस दलातील 19 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या; तिघांची पिंपरी चिंचवड मध्ये बदली

महाराष्ट्र पोलीस दलातील 19 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यापूर्वी त्यांच्या बदल्या झाल्या होत्या मात्र बदलीच्या ठिकाणी जागा रिक्त नसल्याने त्यांची नेमणूक झाली नव्हती. त्यामुळे त्या 19 पोलीस उपनिरीक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी (दि. 10) दिले आहेत.
 
ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्या होत्या. त्यात बदल्या झालेल्या 19 पोलीस उपनिरीक्षकांना पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकांनी 7 जून 2021 रोजी पोलीस महासंचालकांचा आज्ञाकित कक्ष घेतला. त्यात पोलीस उपनिरीक्षकांनी विनंती केल्या प्रमाणे त्यांच्या बदलीच्या ठिकाणात अंशतः बदल करण्यात आला.
 
यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन पोलीस उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. भरत अरुण वारे, श्रीकांत तुकाराम साकोदे, मुकेश शिवाजी मोहरे यांची मुंबई शहर येथून गडचिरोली परिक्षेत्र येथे बदली झाली होती. त्या बदलीमध्ये अंशतः बदल करून त्यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.