शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (09:54 IST)

दुष्काळी लातूरला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी मागितली पाण्याची भिक

लातूर येथे राज्यात प्रथम आणि पुन्हा एकदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाणी वाचविणे काळाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस लातूरचा पाणी साठा कमी होत चालला तरी नागरिक आजही पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहे. पाणी वाचवा यासाठी जनजागृती करण्याच्या हेतुने आज वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातुरात दारोदारी जाऊन पाण्यासाठी भीक मागण्यात आली. पाण्यासाठी भविष्यात भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी जनजागृती करून पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले.
 
लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान अत्यल्प होत असल्याने सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात अनेक गावांत घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. लातूर शहराला १० दिवसाआड पाणी येत आहे. पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना देखील अनेकजण मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवत आहेत. दहा दिवसाला पाणी येऊनही गटारीत पाणी सोडले जात आहे. पाणी वाचविणे काळाची गरज असून याकडे लक्ष वेधण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मोती नगर भागात पाण्यासाठी भीक मागण्यात आली. भविष्यात पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
 
या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष उमाकांत मुंडलीक, वृक्ष लागवड अभियान प्रमुख अमोलप्पा स्वामी, शहर उपाध्यक्ष रामदास घार, सदस्य प्रशांत स्वामी, यासीन मुलानी, त्र्यंबक पाटील यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांनी देखील पाणी वाचवू असा निर्धार केला आहे.