शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (23:45 IST)

अखेर विजय झाला, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

eknath shinde
उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला मशाल असं चिन्ह देण्यात आलं असून शिंदे गटाला अद्याप कोणतेही चिन्ह देण्यात आलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटाला
'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं  यावर त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
 
त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्त्ववादी विचारांचा अखेर विजय, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार..#बाळासाहेबांची शिवसेना असं ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हांसाठी दिलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारला आहे. चिन्हांसाठी तीन नवे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आलं आहे.
 
त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं.'मशाल' हे चिन्ह उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीत नाही. त्यामुळे मशाल चिन्ह देण्यात येत आहे असं निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला सूचित केलं.
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव देता येणार नाही कारण एकनाथ शिंदे गटाने प्रथम प्राधान्य म्हणून हेच नाव सादर केलं आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तुमच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
 
शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरता येणार नाही असं स्पष्ट केलं. तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव वापरता येईल असं स्पष्ट केलं.
 
मात्र त्रिशूळ, गदा ही चिन्हं धार्मिक भावनांशी संलग्न असल्याने वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने शिंदे गटाला सांगितलं आहे. उगवता सूर्य द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाकडे आहे. त्यामुळे हे चिन्हही वापरता येणार नाही असं आयोगाने स्पष्ट केलं.
 
तीन नव्या चिन्हांसाठी 11 ऑक्टोबर अर्थात मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय द्यावेत असं आयोगाने शिंदे गटाला सूचित केलं आहे.
 
 आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठीचे पर्याय दिले होते.
 
त्यानुसार, शिंदे गटानं पुढील पक्षासाठी 3 नावांचा पर्याय सुचवला होता.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांची शिवसेना
शिवसेना बाळासाहेबांची
 
शिंदे गटानं चिन्हांसाठी 3 पर्याय सुचवले होते. यामध्ये,
त्रिशूळ
उगवता सूर्य
गदा
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नावासाठी खालील तीन पर्याय दिले होते.
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे)
याबरोबरीने चिन्हासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन प्रस्ताव देण्यात आले .
 
Edited By - Priya Dixit