मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (07:54 IST)

औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन, वाचा काय सुरु, काय बंद?

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
काय सुरु, काय बंद?
या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.
 
रात्री 9 पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. "गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.