शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत नागरी भागात फटाके विक्रीवर बंदी

मुंबई- सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार शहरातील निवासी भागात फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यादृष्टीने या भागांमध्ये परवान्यांचे वाटपच करण्यात येऊ नये, असे न्यायलयाने म्हटले आहे.
 
नियम मोडणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स यासंबंधी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशांची अंमलबजवाणी करा, असे न्यायलयाने म्हटले आहे. त्यामुळे रहिवासी भागात फटाके विक्री करण्यावर बंदी येणार आहे. तसेच ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे.
 
सरकारी आकडेवारीनुसार प्रशासनाकडून मुंबईत केवळ 87 परवानाधारक फटाके विक्रेते आहेत. यापैकी कायमस्वरूपी फटाक्यांचा व्यवसाय करणार्‍या परवान्यांची संख्या 62 इतकी आहे, तर दिवाळीच्या काळात देण्यात येणार्‍या परवान्यांची संख्या 25 इतकी आहे, परंतु या परवान्यांची संख्याही निम्म्याने कमी करावी, असे निर्देश न्यायलयाने दिले आहेत.