शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (17:16 IST)

दर्शन अपहरण प्रकरण : आरोपीला जन्मठेप

कोल्हापुरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खून खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. खंडणीसाठी दर्शनचं अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 1 लाख 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि  सत्र न्यायाधीश एल. डी. बिले  यांनी हा निकाल दिला.

कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं 25 डिसेंबर 2012 रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर 25 तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती.

पोलिसांनी घटनेचा तपास करुन चारु चांदणे या आरोपीला अटक केली होती. मार्च 2013 मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या.