मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (10:54 IST)

समाजातील प्रत्येक घटक आज संकटात - शरद पवार

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमी झाले असताना देशात मात्र दर प्रचंड वाढले आहे. देशाच्या राजधानीत महिला असुरक्षित आहेत. समाजातील प्रत्येक घटक आज संकटात आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी सरकारच्या कारभारावर बोलताना दिली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आज पक्षाच्या महिला सेलची राज्यस्तरीय बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ  आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. पुढे बोलताना पवार म्हणाले की लोकांसमोर आज बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने आश्वासनं तर खूप दिली मात्र त्यांची पूर्तता करण्यास सरकार अपयशी ठरले आहे असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमी झाले असताना देशात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. केंद्र सरकारने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी इंधनावर कर आकारला, याचा थेट परिणाम महागाईवर झाला असे मत त्यांनी यावेळी उपस्थित केले. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नवीन नोकऱ्या मिळण्याऐवजी असलेल्या नोकऱ्या लोकांच्या हातातून जात आहेत, याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे असा आरोप पवार यांनी केला. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत पवार म्हणाले की देशाच्या राजधानीतच महिला असुरक्षित आहेत. देशाची ही परिस्थिती बदलण्यास कार्यकर्त्यांनी तयार व्हावे असे आवाहन केले.

तर मंत्र्यांच्या घरासमोर काळे आकाशकंदील बांधूू - चित्रा वाघ

या बैठकीत राज्यातील भारनियमनाच्या मुद्द्यावर बोलताना महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की सरकारने दिवाळीपर्यंत भारनियमनाचा निर्णय रद्द केला नाही तर मंत्र्यांच्या घरासमोर काळे आकाशकंदील बांधू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे , आमदार हेमंत टकले आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.