रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (16:37 IST)

बारसू रिफायनरी आंदोलन: 'महिला पोलिसांनी मला फरफटत नेलं,' आंदोलनादरम्यान काय झालं?

बारसू रिफायनरी विरोधात बारसू परिसरात तीव्र आंदोलन सुरू आहे.आंदोलनादरम्यान महिला पोलिसांनी काट्यातून ओढत नेल्याचं महिला आंदोलकांनी सांगितलं आहे.
आंदोलनाच्या वेळी मला सहा महिला पोलिसांनी उचलून नेलं. त्यांनी काट्यातून ओढत नेताना माझा मोबाईल फोन फुटला, कपडे फाटले असं एका महिलेनी सांगितलं.
 
आंदोलनाच्या ठिकाणी अनेक महिला होत्या. त्यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला असता त्यांनी आंदोलनादरम्यान काय झालं हे सांगितलं. ही रिफायनरी आम्हाला नकोय. आम्ही कुठे जाणार. एकदाच्या आम्हाला गोळ्या घाला आणि काय बनवायचं ते बनवा असं या महिलांनी म्हटलं.
 
उदय सामंत म्हणत बोटावर मोजण्याइतके लोक आंदोलनात होते, तर मग 2,500 पोलिसांचा बंदोबस्त कशासाठी असा सवाल एका महिला आंदोलकाने केला.
 
"काल आंदोलनादरम्यान आमच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होते. ते देखील पोलिसांनी हिसकावून घेतले, असं एका आंदोलक महिलेनी सांगितले.
 
शिवसेना (UBT) खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाची पाहणी केली. भूमीपुत्रांचा आवाज दाबण्यासाठीच हे आंदोलन असल्याचे राऊत यांनी माध्यमांना सांगितलं, "चीन आणि भारताच्या सीमेवर भारताचे इतके सैनिक नसतील त्याहून अधिक लोक याठिकाणी तैनात करण्यात आल्याची टीका त्यांनी केली."
 
खासदार विनायक राऊतांना नोटीस, 110 आंदोलकांना जामीन मंजूर
बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
 
बारसू येथे लोकांना भेटायला जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी नोटीस विनायक राऊत यांना बजावण्यात आली आहे.
 
दुसरीकडे माझ्या मतदार संघातील लोकांना भेटायला मी बरसूमध्ये जाणारच अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतली
 
दरम्यान, रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या 110 आंदोलकांना कलम 143, 147,149, 188, 341 व 37(13) / 135 महाराष्ट्र पोलिस कायदा प्रमाणे मंगळवारी (25 एप्रिल) ताब्यात घेण्यात आले होते. त्या सर्वांना राजापूर न्यायालयानं जामीन दिला आहे.
 
बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्याविरोधात हजारो ग्रामस्थ जमले होते.
 
तर रिफायनरी प्रकल्प कोकणाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
 
"रिफायनरीसाठी बारसूची जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच सूचवली होती. शेतकऱ्यांवर दडपशाही केली जाणार नाही. दुटप्पी राजकारण थांबवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं," असंही उदय सामंत म्हणाले.
 
दरम्यान, बारसू येथील प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींना हटविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
माध्यमांच्या प्रतिनिधींशी दुर्व्यवहार झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं सामंत म्हणाले आहेत.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करून म्हटलं की, बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका.
 
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
 
विनायक राऊत घेणार आंदोलनकर्त्यांची भेट
बारसू - सोलगाव येथे सुरू असलेल्या रिफायनरी सर्वेक्षणा विरोधात खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विनायक राऊत घेणार आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत.
 
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही आंदोलन करत आहेत.
 
जिल्हाधिकारी यांना सर्व्हेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण सुरू आहे. पोलिसांच्या दडपशाहीनं ग्रामस्थांचा विरोध चिरडून विनाकारण ग्रामस्थांना अटक करण्यात येत आहे.
 
त्यामुळे बारसू-सोलगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत हे उद्या 26 एप्रिल 2023 रोजी वाजता भेट देणार आहेत.
विनायक राऊत यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
 
प्रकरण काय?
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू या गावात प्रस्तावित रिफायनरी होणार असून त्यासाठी 6200 एकर संपादित करायची आहे. त्यापैकी 2900 एकर जमिनीसाठी लोकांनी परवानगी दिली आहे, असा दावा सरकारने केला.
 
या प्रकल्पातून 1 लाख रोजगार निर्मिती होईल आणि कोयनाचं पाणी या रिफायनरीसाठी वापरावं असा तत्वता निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 नोव्हेंबर 2022 ला मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितली.
 
बारसू, सोलगाव, धोपेश्वर या भागात होऊ शकणा-या रिफायनरी प्रकल्पाबद्दल इथल्या ग्रुप ग्रामपंचायतीत हे मतदान (रेफरण्डम) झालं. सहभागी गावातले रहिवासी यात सामील झाले होते. या मतदानातलं बहुमत हे रिफायनरीच्या विरोधात गेल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये रिफायनरी होऊ नये असा ठराव करण्यात आला. असाच विरोधातला ठराव या प्रकल्पक्षेत्रात येऊ शकणा-या अन्य काही ग्रामपंचायतींमध्ये झाला आहे.
 
रिफायनरीचा प्रवास: नाणार ते बारसू
रत्नागिरीतल्या प्रस्तावित रिफायनरीबद्दल अनेकांगी चर्चा सुरु आहे. काही विरोधात आहेत आणि बाजूनं.
 
राजकीय पक्षांनीही या प्रकल्पावरुन आजवर अनेक कोलांट्या उड्या घेतल्या आहेत. पण या रिफायनरीचा बारसूपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मोठा आहे.
 
2018 मध्ये भारत आणि सौदी अरेबिया मध्ये झालेल्या करारानुसार भारतात या रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव आला. जगातली सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरी असं म्हटलं गेलेल्या या प्रकल्पासाठी रत्नागिरीचा समुद्रपट्टा प्रस्तावित करण्यात आला. त्यासाठी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (RRPCL) ही कंपनी स्थापन करण्यात आली.
 
त्यात सौदी अराम्को, अबु धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC), इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम हे भागिदार आहेत.
 
सर्वात प्रथम हा प्रकल्प राजापूर मधल्या नाणार इथे होणार होता. तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं भाजपा-सेना युतीचं सरकार होतं. पण हा सगळा पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं नाणारच्या प्रकल्पाला विरोध केला.
 
स्थानिक पातळीवर आंदोलनं झाली. असा प्रचंड विरोध झाल्यानं 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर ती जागा रद्द करण्यात आली.
त्यानंतर बराच काळ हा प्रकल्पाच्या आघाडीवर तो बासनात गेल्यासारखा थंड हालचाल होती. राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर ठाकरे आणि शिवसेनेची या रिफायनरीबद्दलची भूमिका बदलली. जानेवारी 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहून बारसू परिसरातली 13 हजार एकर जागा या रिफायनरीसाठी नव्यानं प्रस्तावित केली. तेव्हापासून हा प्रकल्प बारसू आणि परिसरात होणार असं म्हटलं जातं आहे.
 
बारसू, गोवळ, देवाचं गोठणं, सोलगांव अशा गावांचा परिसर, त्यांच्या वाड्या, भवतालचे सडे हा या प्रकल्पासाठीच्या जागेचा भाग असल्याचं म्हटलं जातं आहे. अद्याप या साठी जमीन अधिग्रहण वा अन्य कोणतीही कारवाई झाली नाही आहे. पण नव्यानं सत्तेत आलं शिंदे-फडणवीस सरकार या प्रकल्पाबद्दल आग्रही झालं आहे. विरोध करणा-या आंदोलकांना हद्दपारीच्या नोटीसेस बजावण्यात आल्या आहेत.
 
बारसूच्या समर्थक आणि विरोधकांचे म्हणणे काय?
"बारसूच्या प्रकल्प समर्थकांनी असं सांगितलं आहे की साडेपाच हजार जमिन मालकांची संमती आहे. राजापूर तालुक्यातल्या 50 हून अधिक ग्रामपंचायतींच्या मासिक सभेचे आणि ग्रामसभेचे संमतीचे ठराव त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे रिफायनरी होण्याच्या बाजूचे आहोत असं सांगत त्यांनी माझी भेट घेतलेली आहे.
 
त्यांचं शिष्टमंडळ मला भेटलं आणि ठराव माझ्याकडे दिले. ते मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे देणार आहे. पर्यावरणमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की दोन्ही बाजूंशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल," असं उदय सामंत यांनी मागे सांगितलं होतं.
 
पण स्थानिकांनी मात्र एवढ्या ग्रामपंचायतींचा प्रकल्पाला पाठिंबा आहे हा सरकारचा दावा खोडून काढला आहे.
 
"ते जे 57 ग्रामपंचायतींचा पाठिंबा आम्हाला आहे असं म्हणत आहेत ती वस्तुस्थिती नाही. ते केवळ पंचायतींच्या मासिक सभेचे ठराव आहेत. लोकांन अंधारात ठेवून, सरपंचांना हाताशी धरुन हे ठराव केले गेले आहेत. मुख्य विषय काय आहे ते लोकांपर्यंत गेलंच नाही. ते गेलं असतं तर त्यांनी अशी समर्थनची भूमिका घेतलीच नसती. ज्या 57 पंचायतींबद्दल ते बोलत आहेत, त्यातल्या अनेकांनी नंतर विरोधातले ठराव केले आहेत. त्या पंचायती पण त्यांनी मोजल्या आहेत," असं रिफायनरी विरोधी समितीचे दिपक जोशी म्हणतात.

Published By- Priya Dixit