गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (14:54 IST)

भगतसिंह कोश्यारींची राज्याबाहेर जाण्याची इच्छा, पण अद्याप प्रक्रिया सुरू नाही

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे राज्य सोडून आपल्या राज्यात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण अद्याप त्याबाबतची कोणतीही प्रक्रिया सुरू झाले नसल्याचे राज्यपाल कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.
 
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर विविध नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं पुण्यात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
 
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.
 
याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटलं होतं की,  “भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?
"महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच.”
 
उदयनराजे भोसले भूमिका स्पष्ट करणार
खासदार उदयनराजे भोसले आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत भूमिका जाहीर करणार आहे.
 
राज्यपालांवर कारवाई करण्यासंदर्भात उदयनराजेंनी दिलेला अल्टिमेटम आज संपुष्टात येत असल्यानं ते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
उदयनराजे सध्या शिवप्रेमी संघटनांसोबत पुण्यात बैठक घेत आहेत. त्यानंतर ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
 
भाजपचे टगे महाराष्ट्राला शहाणपणा शिकवतात- संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की, “छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका ही लोकभावना आहे. राज्यपालांचे कार्यक्रम जिथे होतील ते उधळून लावू, ही लोकभावना आहे. महाराष्ट्रानं संयम दाखवला आहे. राज्यपालांचा बचाव केला जातोय. असं कधीच महाराष्ट्रात घडलं नव्हतं.
 
“भारतीय जनपा पक्षाचे टगे शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्रालाच शहाणपणा शिकवत आहेत.”
 
राज्यपालांना हटवण्याची मागणी
“मला असं वाटतं की तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आदर्श कोण? किंवा तुमच्यासाठी हिरो कोण? तर तुम्हाला महाराष्ट्रातच ते भेटतील. बाहेर कुठे जायची गरज नाही. शिवाजी तर जुन्या युगातली गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत इथेच भेटतील,” असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.
 
राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.
 
राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
 
अशी वक्तव्य करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी दोणं योग्य नाही. राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.
 
महाविकास आघाडीने तर त्यांना विरोध केलाच आहे. पण मनसे आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिंदे गटातील काही आमदारांनीही राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी भूमिका घेतलीय.

Published By- Priya Dixit