शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (22:03 IST)

महेश मांजरेकरांच्या मुलानेच नाच्याची भूमिका करावी, बदलापूर मराठा समाज आक्रमक

mahesh manjarekar
संभाजी राजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या चित्रपटांवर इतिहासाची मोडतोड करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर काही संघटना आणि पक्ष आक्रमक होत याविरोधात आंदोलन करत असून हर हर महादेवचे शो बंद करत असून वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा देत आहेत.  ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने चित्रपटगृहांना दिला आहे.
 
बदलापूरमधील सकल मराठा समाजाने शुक्रवारी चित्रपटगृह चालकांची भेट घेत या चित्रपटाला विरोध दर्शवला असून हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा यावेळी चित्रपटगृहांना देण्यात आला. त्यावर चित्रपटगृहचालकांनीही सहकार्याची भूमिका घेतली, अशी माहिती सकल मराठा समाजाकडून देण्यात आली. तसेच हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित न करण्याची मागणी त्यांनी चित्रपटगृह चालकांकडे केली आहे.
 
“महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा मराठा वीर मावळा म्हणून शोभत नाही. मांजरेकरांना त्याला लाँच करण्याची इतकीच घाई असेल, तर त्यांनी त्याला एखाद्या चित्रपटात नाच्याची भूमिका द्यावी,” अशीही टीका यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आली.
 
 वेडात मराठे वीर दौडले सात वादात सापडला
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादात सापडला आहे. मांजरेकरांच्या या चित्रपटाची घोषणा एका मोठ्या कार्यक्रमात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा उपस्थित होते. चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज झाले आहेत त्या पोस्टरवरून संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला असून असल्या प्रकारचे चित्रपट न प्रदर्शित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
 
Edited  By -Ratnadeep Ranshoor