भारिप राज्यातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार
भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारिप महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात भारिप आणि काँग्रेसमध्ये मतभेद सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी काँग्रेसजवळ १२ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रसेकडे १२ जागांवर निवडणुक लढविण्याची मागणी केली होती. ‘ही मागणी मान्य झाली नाही, तर भारिप महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल’, असा इशारा त्यांनी दिला होता.