सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (21:22 IST)

राज्य सरकारचा मोठा निर्णय : समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार

समृद्धी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा म्हणून या महामार्गाची ओळख व्हायला लागली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
 
समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा करण्यात येणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरु आहे. अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावी यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी तसंच महत्त्वाच्या हॉस्पिटलसोबत राज्य सरकार करार करणार आहे. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावा यासाठी एअर अॅम्ब्युलन्स आणि हाॅस्पिटलची सेवा मिळावी यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार आहे.
 
नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे आणि त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना वाहन चालक हे रोड हिप्नोसिसचे बळी ठरत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठं आहे.
 
मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच सात महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या सात महिन्यांच्या कालावधीत 1000 अपघात झाले आहेत. त्यात 100 पेक्षा अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. या कालावधीत कोणत्याही ‘समृद्धी एक्स्प्रेस वे’वर झालेली ही सर्वात मोठी हानी आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor