रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (09:41 IST)

शिवसेनेची नाणार प्रकल्पावरून भाजपवर टीका

फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते - शिवसेनेची नाणार प्रकल्पावरून भाजपवर टीका 
 
कोकण येथील नाणार प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. तर युती झाली तेव्हा प्रकल्प रद्द अशी घोषणा देखील केली आहे. मात्र तरीहीही तरीही राजापुरात प्रकल्प हवाच असा अट्टहास करत भाजपच्या काही स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने तर भाजपला सामना च्या अग्रलेखातून सुनावले आहे. की एक खासदार कमी पडला आणि वाजपेयी सरकार पडले होते असे इशारा देखील दिला आहे. पुढील प्रमाणे अग्रलेख. 
 
कोकणचे ‘गॅस’ चेंबर करा, माणसे मारा, पण नाणार प्रकल्प करा. नाही केलात तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात काम करण्याची धमकी भाजपच्या कुणी जठारने दिली. हा ‘जठाराग्नी’ मुख्यमंत्र्यांनी वेळीच शांत करावा. एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांना जनता माफ करणार नाही.
 
शिवसेना-भाजप ‘युती’वर शिक्कामोर्तब होताना असे ठरले आहे की, रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषदेतच स्पष्ट केले, स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध असल्याने हा रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत होणार नाही, पण तो इतरत्र हलवला जाईल. तरीही एखादा चिल्लू-पिल्लू उठतो व नाणार प्रकल्पाच्या समर्थनासाठी भाडोत्री जमवाजमव करतो. ही कोकणच्या मातीशी, परशुरामाच्या भूमीशी गद्दारी आहे. कोकणच्या विकासाला विरोध करण्याचा दळभद्रीपणा शिवसेना कधीच करणार नाही. विरोध आहे तो विनाशकारी आणि विषारी प्रकल्पांना. कोकणचा निसर्ग, आंबा, फळबाग, शेती, समुद्र, मच्छीमारी यांचा विनाश नाणारसारख्या विषारी प्रकल्पाने होणार असेल आणि त्यातून विष खाऊन मरण्याची वेळ कोकणच्या भूमिपुत्रांवर येणार असेल तर शिवसेना अशा विषारी प्रकल्पांना विरोध करणारच. हा प्रकल्प म्हणजे सोन्याची खाण आहे व राजापुरात रिफायनरी येताच कोकणातील घराघरातून सोन्याचा धूर येईल असे चित्र निर्माण करून कोकणवासीयांच्या जमिनी लाटण्याचा हा प्रकार आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पास आधी स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले. रिफायनरीविरोधात लोक मरण्या-मारण्यासाठी तयार झाले. या तीव्र भावनांची दखल घेऊन शिवसेनेने त्यास पाठिंबा दिला.
 
कोकणातील शेती, फळबाग
हा रोजगार आहे. त्या सगळ्यांचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती तुम्ही करणार आहात? पण कोकणातील काही आपमतलब्यांनी ‘नाणार’ आणणार म्हणून आजूबाजूच्या जमिनींचे सौदे केले व उपऱया ‘शेठजी’ मंडळींना कवडीमोल भावाने जमिनीचे सौदे करून दिले. नाणार येताच विकास होईल व नाणारसाठी पाचपट दराने या जमिनीचे भूसंपादन सरकार करील असे सांगून ज्यांनी सौदे केले त्यांच्या तोंडातले लोणी गळून पडत असल्याने ‘नाणार’ समर्थनाचे दशावतारी सोहळे सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत व नाणार होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पासाठी जी भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे तीदेखील निवडणूक आचारसंहितेपूर्वीच मागे घेतली जाईल असेही स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही नाणार समर्थनाची मोर्चेबांधणी केली जात आहे. नाणार विष प्रकल्पाचे हे समर्थक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, इतकेच नव्हे तर हा विषारी प्रकल्प व्हायलाच पाहिजे असे ठणकावून सांगणार आहेत. हा नीचपणा जितका आहे तितकाच निर्घृणपणा आहे. पालघर जिल्हय़ातील तारापूर प्रकल्पामुळे सध्या त्या परिसरात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे कॅन्सरसारखे आजार वाढले आहेत. जमिनीतून व पिण्याच्या पाण्यातून विष निघत आहे व समुद्रही विषारी झाला आहे. त्यामुळे मासेमारीवर जगणाऱ्या समाजापुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. पालघर हा कोकणचाच एक भाग असून अशा अनेक विषारी प्रकल्पांनी कोकणची दैना उडाली आहे. कोकणात समुद्र आहे हा तेथील जनतेचा गुन्हा झाला काय? आहे तो निसर्ग, पर्यावरण वाचवता येत नाही. मग उरलेला निसर्ग खतम का करताय? कोकणचे ‘गॅस’ चेंबर करा, माणसे मारा, पण नाणार प्रकल्प करा. नाही केलात तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात काम करण्याची धमकी भाजपच्या कुणी जठारने दिली. हा ‘जठाराग्नी’ मुख्यमंत्र्यांनी वेळीच शांत करावा. एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांना जनता माफ करणार नाही. कोकणची जनता ‘पै-पै’ गोळा करून या विष समर्थकांची भूक भागवील, पण गरीब जनतेच्या पिढय़ा रिफायनरीच्या विषाने मारू नका. मुंब्रा भागात काही तरुण धर्मांध अतिरेक्यांना पकडण्यात आले. त्यांना कुंभमेळ्यातील पाण्यात विष मिसळून माणसे मारायची होती. जठारसारख्या नाणार प्रकल्प समर्थकांनाही तोच अतिरेकी प्रकार घडवून विषप्रयोगाने माणसे मारायची आहेत काय? हे निर्घृण तितकेच अमानुष आहे!